Edotorial

आजारामुळे देशाचे अर्थकारण ठप्प होवून विकासाच्या बाबतीत देश आज कोसो मैल मागे जावून पडला आहे. रेल्वेसेवा व अन्य प्रवासी सेवा बंद असल्याने दळणवळणही रोडावले. देशात आधीच बेरोजगारीचा भस्मासूर वाढत असताना कोरोनाने त्यात आणखी भर टाकली आहे.

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना (Corona) महामारीचा उद्रेक झाला आहे. आपल्या देशातही कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे (economy) व सर्वसामान्यांच्या जीवनचक्राबाबत होत्याचे नव्हते होवून बसले आहे. अर्थकारण थंडावले आहे. कोरोना केवळ आदार असता त्यावर उपचार करणे शक्य होते. मात्र हा आजार असा आहे की, ज्यावर दवाच नसल्याने सुरुवातीच्या काळात दुवाचाच आधार घेण्याची पाळी आली आहे. या आजारामुळे देशाचे अर्थकारण ठप्प होवून विकासाच्या बाबतीत देश आज कोसो मैल मागे जावून पडला आहे. रेल्वेसेवा व अन्य प्रवासी सेवा बंद असल्याने दळणवळणही रोडावले. देशात आधीच बेरोजगारीचा भस्मासूर वाढत असताना कोरोनाने त्यात आणखी भर टाकली आहे. कोरोना आपल्या देशात येवून आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी हा आजार संपुष्ठात येण्याची चिन्हे नाहीत. उलट त्याचा मुक्काम वाढत चालला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. मृत्यूदर मंदावल्याचे प्रशासन सांगत असले तरी कोरोनाच्या विळख्यात मृत होण्याची आकडेवारी वाढताना दिसत आहे. सरकार व प्रशासनासह जनसामान्यही हतबल झाले आहे. मात्र दुर्दैवाने राजकारण्यांना कोरोनाचे कोणतेही सोयसुतक नसून त्यांना राजकीय तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची आहे. त्यातूनच आरोप-प्रत्यारोपाचा राजकीय कलगीतुरा सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरु झाला आहे. वास्तविकपणे कोरोना महामारी संकटाचा सामना करताना सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात घालून एकत्रितपणे काम करतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. परंतु राजकारण्यांमध्ये इतकी वैचारिक प्रगल्भता असती तर देशाच्या विकासाला अडथळा कधीही आला नसता. कोरोना काळातच देशाचा विकासदर मोदींच्या काळात मंदावल्याचेही प्रकाशझोतात आले. कोरोना आटोक्यात आणताना विविध राज्य सरकारांना पडलेल्या मर्यादा व विकासदर उचावण्यात नाही तर विकासदर राखण्यात मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला अपयश आल्याने सर्वसामान्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सुशांतची आत्महत्या, कंगनाचा तमाशा हा खेळ राजकारण्यांकडून सुरु झाला. कोरोनाने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचेही कंगनाप्रकरणाने घरात बसल्या बसल्या मनोरंजनही झाले. कंगना हा विषय इतका मोठा नव्हता की त्यामुळे देशापुढील समस्यांचा सर्वांना विसर पडावा. परंतु जाणिवपुर्वक हे प्रकरण तापविण्यात आले. यामुळे काही काळ कोरोनाचा उद्रेक, विकासदरातील अपयश, चीन-भारत सीमारेषेवरील तणाव याचा काही काळ महाराष्ट्रीयन जनतेला विसर पडला. पण हे मृगजळ फार काळ टिकले नाही. कंगना मनालीला जाताच, वातावरण निवळताच महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा वास्तवाचे भान पडले.