किती दिवस चालवणार जुन्या पुलांवरून रेल्वेगाड्या?

जुन्या रेल्वे पुलांवर फारसा भरवसा न ठेवता त्या ठिकाणी नवीन 'पूल बांधण्यासाठी रेल्वे विभागाने प्राधान्य देण्याची गरज आहे. इंग्रजांनी बांधलेले पूल तंदुरुस्त असल्याचे सांगून या पुलावरून किती काळ रेल्वे चालवणार आहात. पुलांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती करणे आवश्यक आहे.

    सुरक्षित रेल्वेप्रवास हा प्रवाशांचा हक्क आहे आणि ते रेल्वेचे दायित्वही आहे. परंतु सध्या रेल्वे रुळांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रेल्वेचे पूलसुद्धा अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. कोणताही अपघात हा सांगून येत नसतो, त्यासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

    देशातील ३४६६५ पूल असे आहेत की, त्यांना बांधून १०० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी हे पूळ बांधले होते. या. पुलांवरून अजूनही प्रवासी गाड्या आणि मालगाड्या चालत आहेत. तांत्रिकदृष्ट्या या पुलांचे आयुष्य संपलेले आहे. या पुलांचे आयुष्य संपलेले आहे, अशी सूचना देणारी पत्रे हे पूल बांधणाऱ्या ब्रिटिश कंपन्यांनी भारतीय रेल्वेला पाठविली आहेत.

    हे पूल तुटून काही दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी आता आमच्यावर राहणार नाही, असेही या कंपन्यांनी भारतीय रेल्वेला कळविले आहे. परंतु भारतीय रेल्वेने मात्र या पत्रांची कोणतीही दखल घेतलेली नाही. वरून जरी हे पूल मजबूत दिसत असले तरी या पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेले लोखंड गेल्या १०० वर्षांत नक्कीच गंजले. या लोखंडाची भारवहन करण्याची क्षमता निश्चितच कमी झालेली असणार.

    पूर्वी वाफेवर चालणारे रेल्वेइंजिन होते त्यामुळे त्या रेल्वेगाडीला कमी डबे राहत होते. आता इलेक्ट्रिक इंजिन आल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. जास्त बोगी लागत असल्यामुळे प्रवाशांची संख्याही जास्त झालेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत.

    रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात असे स्पष्टीकरण दिले आहेत की, वर्षातून दोनदा पुलांचे निरीक्षण करण्यात येते. एकदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळा संपल्यानंतर पुलांचे निरीक्षण करण्यात येते. जुन्या रेल्वे पुलांवर फारसा भरवसा न ठेवता त्या ठिकाणी नवीन ‘पूल बांधण्यासाठी रेल्वे विभागाने प्राधान्य देण्याची गरज आहे. इंग्रजांनी बांधलेले पूल तंदुरुस्त असल्याचे सांगून या पुलावरून किती काळ रेल्वे चालवणार आहात. पुलांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती करणे आवश्यक आहे.