मध्यप्रदेशातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तांदूळ

स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी जो चांगला तांदूळ आला होता तो बाहेरच्या बाहेरच विकण्यात आला आणि राईस मिलकडे जो जुना निकृष्ट तांदूळ शिल्लक होता तो गरिबांना वितरित करण्यात आला.

गरीबसुद्धा शेवटी मनुष्यच असतो. जो तांदूळ (Inferior rice )सडलेला होता. पाण्यात भिजलेला होता तो स्वस्त धान्य दुकानातून का वितरित करण्यात आला? केंद्रीय अन्न आणि खाद्य पुरवठा मंत्रालयाच्या एका चमूने छिंदवाडा आणि बालाघाट येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या ७२ नमुन्याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर आता मध्यप्रदेश सरकारचे डोळे उघडले आहेत. राज्यसरकारने १८ राईस मिल सील केले असून दोषींवर कारवाई सुरु केली आहे. या निकृष्ट तांदूळ वाटप प्रकरणी जो भ्रष्टाचार झालेला आहे तो मिल मालक आणि आधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झालेला आहे, हे तेवढेच खरे. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने मध्यप्रदेशातील शिवराजसिंह सरकारला उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यासाठी जो चांगला तांदूळ आला होता तो बाहेरच्या बाहेरच विकण्यात आला आणि राईस मिलकडे जो जुना निकृष्ट तांदूळ शिल्लक होता तो गरिबांना वितरित करण्यात आला. हा तांदूळ खाल्ल्यामुळे कित्येक गरीब आजारी पडले असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारल्या जात आहे. यानंतर राज्य सरकारने बालाघाट येथील जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले असून मंडला जिल्ह्याच्या अन्न निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे. आता मध्यप्रदेश सरकार जेथे-जेथे तांदळाचे गोदाम आहेत, तेथील तांदळाची चौकशी करणार आहेत. या प्रकरणावरुन इ.स. १९६६-६७ मध्ये स्वस्त धान्य दुकानातून विदेशी लाल गहू आणि मिलो नावाची ज्वारी वितरित करण्यात आली होती. हे धान्य जनावरंसुद्धा खात नव्हते, याचे स्मरण झाले. तेव्हा देसात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होता. परंतु आता तर देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. असे असतानाही या निकृष्ट तांदळाचे वितरण का करण्यात आले? यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे.