…म्हणे हे तर ‘लसीकरण पर्व’; दिवा, थाळी, टाळी नंतर पंतप्रधानांचा नवा फंडा

देशात कोरोना महामारीने उच्छाद मांडला आहे. महाराष्ट्र या महामारीने सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवू लागला असतानाच दुसरीकडे मात्र रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटांची कमतरता भासू लागली आहे.

    संक्रमितांची आणि मृतकांची संख्याही दिवसेंदिवस वाढू ‘लागली आहे. महाराष्ट्र राज्यच नाही तर अनेक भाजपाशासित राज्येही केंद्राकडून कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रार करीत आहेत. दिल्ली, पंजाब, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशला लसींचा पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत जनतेला व्यर्थचे राजकारण नको आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी चाचणी आणि लसीकरणावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. ११ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान संपूर्ण देशात कोरोना ‘लसीकरण पर्व’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवे लावा, घराच्या गॅलरीमध्ये येऊन ताट बाजवा, टाळ्या वाजवा असे आवाहन केले होते. हा कोरोना महामारीवर इलाज नव्हे, हे माहीत असतानाही जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन केलेले आहे. कदाचित लोकांमध्ये आत्मविश्‍वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी तेव्हा पंतप्रधानांनी हे आवाहन केले असावे.

    आता पंतप्रधानांनी कोरोनाची चाचणी आणि लसीकरण करण्यावर भर दिला असावा. वस्तुस्थिती तर अशी आहे की, ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे या राज्यात ‘लॉकडाऊन लागू करणे अशक्‍य आहे. बंगालमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शोला प्रचंड गर्दी उसळत आहे. परिणामी कोरोनाचा प्रचंड विस्फोट होण्याची शक्‍यता बळावली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. यासोबतच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचीही मागणी केलेली आहे.