जयसिंगराव गायकवाड यांचा राजीनामा, खडसेनंतर भाजपला मोठा धक्का

जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी बीड लोकसभा (Beed constituency ) मतदारसंघाचे ३ वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. ते केंद्र सरकारमध्ये (Center Government) मानव संसाधन राज्यमंत्री सुद्धा होते. भारतीय जनसंघाच्या कार्यकाळापासून ते पक्षाशी जुळलेले होते.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांचा पक्ष सत्तेत असावा, असेच वाटत असते. पक्ष जेव्हा सत्तेत नसतो, तेव्हा त्यांचा मोहभंग होत असतो. पक्षी ज्याप्रमाणे फळाने बहरलेल्या वृक्षावर मोठ्या प्रमाणावर असतात, त्याचप्रमाणे नेत्यांचा कलही सत्ताधारी पक्षाकडेच असतो. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या सत्तेत नाही. त्यामुळे अनेक असंतुष्ट नेते भाजपमधून बाहेर पडत आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)  प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा मिळवून मराठवाड्यात भाजपला बळकट करण्यासाठी जीवाचे रान करणारे जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. हे काही अचानक घडले नाही. जेव्हा एखाद्या नेत्याला पक्षामध्ये त्यांची होत असलेली उपेक्षा सहन होत नाही, तेव्हा कोणताही स्वाभिमानी नेता त्या पक्षाचा त्याग करून बाहेर पडत असतो. जयसिंगराव गायकवाड यांनी बीड लोकसभा मतदारसंघाचे ३ वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. ते केंद्र सरकारमध्ये मानव संसाधन राज्यमंत्री सुद्धा होते. भारतीय जनसंघाच्या कार्यकाळापासून ते पक्षाशी जुळलेले होते. राज्यातील पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. इतक्या अनुभवी आणि कुशल संघटक असलेल्या नेत्याला कोणतीही जबाबदारी न देता त्यांची उपेक्षा करण्यात येत असेल तर ते पक्षात कसे राहतील? जयसिंगराव गायकवाड हे पंकजा मुंडे यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी होते.

पंकजा मुंडे यांनीही जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपला सोडचिठ्ठी दिली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. पंकजा मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवतीर्थावर जावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे ही बाब पंकजा सुद्धा भाजपचा राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत, असे त्यांच्या निकटस्थ नेत्यांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. जयसिंगराव गायकवाड पक्षाला बळकट करण्यासाठी आपल्यावर निश्चित स्वरूपाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी मागील एक दशकापासून पक्षाकडे करीत होते, परंतु पक्षाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. पक्षात आपली उपेक्षा होत आहे, अशी त्यांची भावना झाली आणि अखेर त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एकनाथ खडसे यांच्या बाबतीतही असेच घडले. खडसे यांनी दीर्घकाळपर्यंत प्रतीक्षा केली, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्षच करण्यात येत होते, त्यामुळे निराश होऊन शेवटी त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीची वाट धरली.