corruption

ज्या महाराष्ट्रात समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करुन जनजागृती केलेली आहे. त्याच महाराष्ट्रात लाचखोरी का वाढते आहे? राज्यात मोठमोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं का होतात? पूर्वी लोक बदनामीला घाबरत होते.

भ्रष्टाचाराशी (corruption) संबंधित गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. अन्य राज्याच्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये (corruption Cases) महाराष्ट्रात दुपटीने वाढ झालेली आहे. सरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. लाच दिल्याशिवाय सरकारी अधिकारी-कर्मचारी कोणतीही कामे करीत नाही. अशी परिस्थिती आहे. तथापि, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तक्रार करणारे नागरिकही आता मोठ्या संख्येने पुढे येत असल्यामुळे अनेक कार्यालयातील भ्रष्टाचार उघड होत आहे. राष्ट्रीय अपराध पंजीयन ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ८९१ भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झालेलेल आहेत. भ्रष्टाचारात महाराष्ट्रानंतर राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानमध्ये ४२४ भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. तामिळनाडू ४१८, कर्नाटक ३७९, ओडिशामध्ये ३५३ प्रकरणे उघड झाली आहेत. गोवा ९, मणिपूर ६, मेघालय२, मिझोरम२, आणि नागालँड येथे केवळ १ भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले आहेत. देशात सिक्किम असे राज्य आहे की, तेथे एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण घडले नाही. महाराष्ट्रात ८६६ भ्रष्टाचाराच्या घटना सापळा रचून पकडण्यात आल्या आहेत. यातील ३७० प्रकरणांचा न्यायालयातून निपटारा झाला असून ५५ प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. २९४ आरोपींची निर्देोष सुटका करण्यात आली तर ३१ प्रकरणे पुराव्याअभावी मागे घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात १४.९ प्रकरणात भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकूणच भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्या महाराष्ट्रात समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करुन जनजागृती केलेली आहे. त्याच महाराष्ट्रात लाचखोरी का वाढते आहे? राज्यात मोठमोठी भ्रष्टाचाराची प्रकरणं का होतात? पूर्वी लोक बदनामीला घाबरत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत नव्हता, परंतु आजच्या काळात मात्र लोक सामाजिक बदनामीची चिंताच करीत नाही. चुकीची कामे करुन पैसा मिळवायचा आणि लवकर श्रीमंत व्हायचे, अशी भावना लोकांमध्ये रुढ झालेली आहे. प्रामाणिक कर्मचारी लोकांना खटकतात. जे सिद्धांतवादी अधिकारी असतात त्यांची वारंवार बदली करण्यात येते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे प्रमाणही अन्य राज्याच्या तुलनेत जास्त आहेत, म्हणूनच दोषीही अधिक आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, तथापि उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्येही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे.