Need a Central Vista project? nrsj

वैद्यकीय महाविद्यालयाची देशाला गरज आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केल्यास डॉक्टरांच्या संख्येत वाढ होईल व त्याचा लाभ देशवासीयांना मिळेल.

मोदी सरकारचा (Modi Government) अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठी रक्‍कम खर्च करून उभारण्यात येणारा सेंट्रल विस्टा प्रकल्प ( Central Vista project) खरोखरच देशासाठी अत्यावश्यक आहे का? हा प्रकल्प उभारला नाही तर काम भागणार नाही का? देश कोरोना महामारीच्या संकटातून वाटचाल करीत आहे. देशात बेकारी प्रचंड वाढलेली आहे. देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. देशाची अर्थव्यवस्था डामाडोळ अवस्थेत आहे. बँकांच्या डुबित कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकले जात आहेत. देशातील ३० कोटी जनता उपाशीपोटी झोपी जात आहे, अशा परिस्थितीत सरकार २ हजार कोटींपेक्षाही जास्त गुंतवणुकीचा सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू करण्याचा सरकार विचार करीत आहे.

या प्रकल्पाला कॉन्स्टिट्यूशनल कंडक्‍ट ग्रुपच्या बॅनरखाली ६९ सेवानिवृत नोकरशहांनी विरोध केला आहे. या नोकरशहांनी म्हटले आहे की, एव्हढी मोठी रक्‍कम या प्रकल्पामध्ये गुंतविण्यापेक्षा देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी हा पैसा खर्च केला तर त्याचा लाभ जनतेला मिळेल. सर्वसोयीयुक्त रुग्णालये उभारण्याची देशाला सध्या नितांत गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची देशाला गरज आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केल्यास डॉक्टरांच्या संख्येत वाढ होईल व त्याचा लाभ देशवासीयांना मिळेल. देशातील लोकसंख्या लक्षात घेता डॉक्टरांची संख्या सध्या फारच कमी आहे. शहरी भागामध्ये १००० लोकसंख्येमागे केवळ १ डॉक्टर आहे. तर ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात तर यापेक्षाही वाईट अवस्था आहे.

शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राधान्य देण्याऐवजी सरकार अनावश्यक कामांना का महत्त्व देत आहे, असा सवालही या अधिकार्‍यांनी केला आहे. या संदर्भात पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रावर वरिष्ठ सेवानिवृत आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सेंट्रल विस्टा प्रकल्पामुळे पर्यावरणाला अनेक अडचणी निर्माण होणार आहेत, असे असतानाही पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. सेंट्रल विस्टामध्ये सर्वसुविधायुक्‍्त नवीन संसद भवनाचे बांधकाम करण्याचेही प्रावधान करण्यात आले आहे. याशिवाय साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, राष्ट्रपती भवन व सेंट्रल सेक्रेटरियट हे सर्व सेंट्रल विस्टामध्ये येतात. या सर्व इमारती अत्यंत मजबूत आहेत. ब्रिटिशांनी या इमारतीचे बांधकाम केलेले आहेत. परंतु पंतप्रधानांना असे वाटते की, या इमारती ब्रिटिशांच्या कार्यकाळाचे स्मरण देत असतात. गुलामीची आठवण देणाऱ्या या इमारती पाडून भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाचे स्मरण व्हावे, अशा स्वरूपाच्या इमारती बांधण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.