घरचा आहेर : नितीशकुमारांचा त्वेष, हेरगिरीवरून केंद्राला सवाल

आपल्याच सहकार्याने बिहारच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झालेले नितीशकुमार जासुसीच्या मुद्द्यावरून आपल्यावरच उलटेल असे भाजपला वाटले नसेल, परंतु नितीशांनी विरोधकांच्या सुरात-सूर मिळवून पेगॅससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाच आडव्या हाताने घेतले. पेगॅसस प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

    नितीशांनी भाजपा आणि केंद्र सरकारला अडचणीत आणणारे वक्तव्य केले. संसदेत पेगॅसस जासुसीप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. जेव्हा इतक्या दिवसांपासून संसदेमध्ये या मुद्यावर विरोधक गोंधळ घालत आहेत, तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणलेच पाहिजे. जर एखादी व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल तर त्या व्यक्‍तीची चौकशी व्हायलाच पाहिजे.

    अनपेक्षितरित्या नितीशकुमारांनी विरोधकांच्या मागणीचे समर्थन केल्यामुळे विरोधक खूश झाले असतील. भाजपाला त्यांचा सहकारी पक्ष जदयुनेच जासुसीच्या मुद्दयावरून आडव्या हाताने घेतले. बिहारमध्ये भाजपाचे जास्त आमदार असताना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नसल्यामुळे भाजपाने नितीशकुमारांना मुख्यमंत्री बनविले. या विवशतेवर वक्‍तव्य करताना भाजपाचे मंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, आघाडीचे सरकार चालविणे आव्हानात्मक असते. बिहारमध्ये आमचे सरकार नाही.

    उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात आमची स्वबळावर सरकारे आहेत, त्यामुळे तेथे आम्ही स्वतंत्ररित्या निर्णय घेऊ शकतो. परंतु सरकार चालविणे आणि जनताभिमुख कार्य करणे हे आव्हानच असते. नितीशकुमारांच्या या अस्वस्थेवरून आणि सम्राट चौधरी यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट आहे की, पुढील १० वर्षेपर्यंत केंद्रात पंतप्रधानपदासाठी नितीशांना कोणतीही संधी मिळणार नाही.

    जदयुच्या नेत्यांना पुढील १० वर्षेपर्यंत पंतप्रधानपदासाठी वाट बघावी लागणार आहे. इस्त्रायलचे सॉफ्टवेअर पेगॅससचा मुद्दा बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलून धरलेला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, यासाठी विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज ठप्प पाडले आहे.

    Nitish Kumars hatred questioning the Center over espionage