पीके’ स्वतःच्याच राजकीय शोधात…

    आपण निवडणूक व्यवस्थापन व्यवसायातूनच बाहेर ‘पडत आहोत, अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केल्यामुळे, अनेकांना स्वाभाविकपणे धक्का बसला आहे. ‘पीके’ नावाने ते परिचित आहे. अनेक वर्षे राजकीय व्यूहरचना करून त्यांनी स्वतःकडे तसे दुर्लक्ष केले. अनेकांना सत्ता मिळवून देताना, मात्र त्यांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली. असे म्हणतात, ‘पीके’ आता स्वतःच्याच राजकीय शोधात निघाले आहेत. त्याची पहिली पायरी म्हणजे त्यांचा राजकीय संन्यास होय. नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान होता आले त्या प्रक्रियेत निवडणूक व्यूहरचनाकार म्हणून ज्यांचा हात होता, त्या प्रशांत किशोर यांनी यावेळी तमिळनाडूत द्रमुकळा आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. प. बंगालमध्ये आम्हाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, हा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला, तेव्हा कोणत्या आधारावर हे बोळत आहात, असा प्रतिप्रश्‍न एकाही पत्रकाराने केला नाही, याबद्दल किशोर यांनी आश्चर्य व्यक्‍त केले आहे.

    किशोर यांनी टेलिव्हिजनवरील मुलाखतींमधून निवडणूक आयोगावर कोणतीही भिडभाड न ठेवता थेट हल्ला चढवला. प. बंगालमध्ये आश्‍चर्यकारकपणे आठ टप्प्यांत मतदान घेणे, तेथील एकाच जिल्ह्यात मतदानाचे चार टप्पे करणे, याबद्दल त्यांनी तोफ डागली आणि प्रसारमाध्यमेही आयोगाला कोणतेही सवाल कसे करत नाहीत, असा प्रश्‍न केला . युनिटी, चाय पे चर्चा, मंथन आणि समाज माध्यमांवरील कार्यक्रम या सर्व कल्पना किशोर यांच्याच होत्या. त्यानंतर किशोर यांनी मोदींपासून दूर जाणे पसंत केळे आणि आपल्या ‘कॅग’चे रूपांतर इंडियन पोलिटिकल ऐँक्शन कमिटी’ (आय-पॅक ) मध्ये केळे. अमेरिकेतील लॉबिंग करणार्‍या गटांना पॅक’ असे संबोधले जाते. त्यावरूनच किशोर यांनी आपल्या कंपनीचे हे नाव ठेवले. 2015 मध्ये या संस्थेने नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. ‘नितीश के निश्चय विकास की गॅरंटी’ ही त्यांनी बनवलेली घोषणा खूप गाजली. मुख्यमंत्री होताच नितीशकुमार यांनी किशोर यांना नियोजन आणि प्रकल्प अंमलबजावणी सल्लागार म्हणून नेमले. निवडणूक प्रचारात जो सात कलमी कार्यक्रम त्यांनी जाहीर केला होता, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम किशोर यांच्यावर सोपवण्यात आले होते. मात्र, प्रशांत किशोर यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी त्यांना पक्षातून हाकलले. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी किशोर यांचाच सल्ला घेतला होता. तेथे काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजित जेवा यांनी किशोर यांचे जाहीर अभिनंदन केले 2022 मधील विधानसभा निवडणुकीकरिताही पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी किशोर यांचीच सल्लासेवा मागितली आहे. किशोर यांनी हा पेशा सोडला असला, तरी ‘आय-पॅक’ कंपनीच्या माध्यमातून हे काम चाळू राहणारच आहे.