आता बोला! विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांना आली जाग

देशात जेव्हा कोरोना महामारीचा वेगाने फैलाव होत होता आणि व्हॅक्‍सिन, ऑक्सिजन आणि बेडसाठी लोक सारखे भटकत होते, तेव्हा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बंगाल विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते. कोणत्याही परिस्थितीत बंगालवर त्यांना भाजपाचा झेंडा फडकावयाचा होता. दरम्यान या कालावधीत देशात कोरोना महामारीचा प्रकोप वेगाने वाढत असतानाही या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र बंगालमध्ये जाऊन तेथे निवडणूक प्रचारसभा घेण्यात व्यस्त होते. ‘दिदी ओ दिदी’ म्हणत ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देत होते. देशाचे पंतप्रधान एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा मुकाबला करण्यासाठी ते आपली शक्ती पणाला लावत असल्याचे संपूर्ण देशाने बघितले आहे.

  या संपूर्ण कालखंडात कोरोनामुळे देशातील मृत्युसंख्येत मोठी वाढ झाली. कोरोना महामारीकडे पंतप्रधानांचे दुर्लक्षच झालेले दिसले. कारण बंगाल निवडणूक प्रचारामुळे पंतप्रधानांना या भीषण महामारीकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. या दरम्यान कोरोना ‘पीडितांसाठी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासू लागली. पीडितांना ऑक्सिजन मिळत नव्हता. रुग्णवाहिकांचे चालक-मालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळत होते. मृतदेह गंगेत टाकून देण्यात येत होते.

  राजकारणाला प्राधान्य दिल्या जात होते. राजकारणापुढे मानवी संवेदनाच क्षीण होऊन गेल्या होत्या. एप्रिल महिन्यात ठिकठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही अनेक राज्यांत मोठमोठ्या निवडणूक सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये प्रचंड गर्दी होती. मास्क लावण्याला तिलांजली देण्यात आली. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी निवडणुकांना प्राधान्य देण्यात आले. निवडणुका घेतल्या नसत्या तर काय झाले असते? ज्या राज्यात निवडणुका घ्यायच्या होत्या, तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली असती. निवडणुका केव्हाही घेता आल्या असत्या.

  पंतप्रधानांना जाग तेव्हा आली की, जेव्हा कॅनिनेट सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांना सांगण्यात आले की, कोरोना आता गावागावांत पोहोचला आहे. परंतु गावखेड्यात मात्र कोरोनाची चाचणी करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. परिणामी कोरोना परिस्थितीचा योग्य अहवाल येऊ शकत नाही.

  पीएम केअर्स फंडातून राज्यांना देण्यात आलेले काही व्हेंटिलेटर सुरू आहेत तर काही राज्यातील व्हेंटिलेटर मात्र बंद पडलेले आहेत. हे व्हेंटिलेटर चालविण्यासाठी तंत्रज्ञ नाहीत. ही सर्व परिस्थिती जेव्हा पंतप्रधानांना विशद करण्यात आली तेव्हा ते अक्षरशः सुन्न झाले. लगेच पंतप्रधानांनी संपूर्ण देशात कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले.

  Prime Minister woke up only after the Assembly elections