पंतप्रधानांचा केवळ गुजरात दौरा; वादळ प्रभावित इतर राज्यांकडे मात्र दुर्लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे प्रमुख आहेत. देशातील सर्व राज्यांच्या प्रति त्यांचा समान दृष्टिकोन असायला हवा, त्यांचे गृहराज्य गुजरातबाबत त्यांना विशेष प्रेम असणे स्वाभाविक आहे, परंतु पंतप्रधान या नात्याने देशातील इतरही संकटग्रस्त राज्यांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.

    चक्रीवादळात केरळपासून गुजरातपर्यंतच्या सर्वच राज्यांना मोठा तडाखा बसला आहे. महाराष्ट्रातही चक्रीवादळामुळे करोडोंचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळात मुंबईतील समुद्रात मालवाहू जहाज बुडाले. या जहाजामध्ये असलेले ९३ लोक बेपत्ता आहेत. त्यांचा घेणे सुरू आहे. महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे डझनावर लोकांचा मृत्यू झाला. कित्येक घरे कोसळली. या चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला.

    कोकण किनारपट्टीवरील शेकडो काजू आणि आंब्याची झाडे उन्मळून पडली. गोवा-दमन येथेही मोठी हानी झाली. पंतप्रधान मोदी चक्रीवादळाच्या नुकसानीची ‘पाहणी करण्याकरिता गुजरातच्या दौऱ्यावर जाणे योग्य आहे. तेथे १३ जण मृत्यूमुखी पडले असून ४० हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. १६५०० घरे कोसळली आहेत. लाखो लोकांचे जीवन अंधःकारमय झालेले आहे.

    पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या राज्यातील नुकसानीची हवाई पाहणी केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. ते अहमदाबाद प्रमाणे मुंबईत येऊन मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांना भेटून वादळग्रस्त विभागातील लोकांना धीर देऊ शकत होते. महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही म्हणून काही फरक पडला नसता. संकटकाळात प्रत्येक राज्यातील सरकार केंद्र सरकारकडून सहानुभूती आणि मदतीची अपेक्षा ठेऊन असते.

    पंतप्रधानांनी सर्वच वादळग्रस्त राज्याचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली असती तर अधिक योग्य झाले असते. कोणताही नेता राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर त्यांनी प्रादेशिक वादापासून मुक्‍त होऊन ‘सबका साथ, सबका विकास’ ही भावना जोपासणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी गुजरात बरोबरच देशातील अन्य वादळग्रस्त राज्याचा दौरा करून नुकसानीची ‘पाहणी केली असती, तर त्यांना सर्वांचे प्रेम आणि सहानुभूती नक्कीच मिळवता आली असती.

    Prime Ministers visit to Gujarat only Ignore other storm affected states