सुशासनबाबूंच्या प्रतिमेला धक्का; नितीश सरकारपुढे मोठी आव्हाने

 'सुशासन बाबू' नितीशकुमारांचे नेतृत्व असतानाही बिहार अस्थिरता आणि अराजकतेकडे वाटचाल करीत आहे.

  लालूप्रसाद यादव राजकारणात पुन्हा अप्रत्यक्षरित्या सक्रिय होण्याची भीती नितीश यांना आहे. लालूप्रसादांना निवडणूक लढविण्यास अयोग्य घोषित केल्यानंतरही त्यांचा बिहारच्या राजकारणात प्रभाव कायम आहे. बाहेर राहूनही ते त्यांची मुले तेजस्वी आणि तेजप्रताप तसेच राजदच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवू शकतात.

  दरम्यान, बिहारचे समाजकल्याणमंत्री मदन सहनी यांनी राजीनामा देण्याचा इशारा देऊन  नितीशकुमार यांना मोठा धक्का दिलेला आहे. सहनी यांनी म्हटले आहे की, आपण नोकरशाहीच्या विरोधात राजीनामा देत आहोत. अधिकारी आपले म्हणणे ऐकत नसल्यामुळे आपण जनतेची कामे करू शकत नाही. जर आपण लोकांची कामेच करू शकत नाही, तेव्हा केवळ पदावर राहून सरकारी सुविधा घेण्यात काय अर्थ आहे?

  मदन सहनी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटस्थ अधिकारी चंचलकुमार यांच्या संपतीच्या चौकशीची मागणी केली होती. नोकरशाहीवर नाराजी व्यक्‍त करताना सहनी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक वर्षांपासून हुकूमशाही सहन करीत आहोत, परंतु आता मात्र आम्हाला ती सहन होत नाही. आम्ही तर एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव ठेवला तर सरकारकडून त्याकडे कानाडोळा केला जातो.

  एकीकडे सहनी यांनी सरकारच्या विरोधात झोड उठविली तर दुसरीकडे राजद प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जदयूचे २३ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे. हे आमदार आणि अनेक माजी आमदारही राजदमध्ये सामील होणार असल्याचे सहनी यांनी म्हटले आहे. श्याम रजक, रमईराम, उदयनारायण चौधरी यांच्यासारखे नेते नितीशकुमार यांच्यावर नाराज आहेत.

  जर जदयुचे आमदार पक्षातून बाहेर पडले तर मुख्यमंत्री नितीशकुमार कमजोर होतील आणि भाजपा त्यांच्यावर अधिक दबाव वाढवतील. बिहारमध्ये भाजपाचे आमदार जास्त असतानाही, नितीशकुमार यांच्याकडे यासाठी बिहारचे मुख्यमंत्रिपद सोपविण्यात आले की, भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी प्रभावशाली असा चेहरा नव्हता.

  भाजपचे आमदार ज्ञानेंद्रसिंह ज्ञानू यांनी भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला असून भाजपाचे ८० टक्के आमदार लाचखोर आहेत, असा आरोप केला आहे. या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यामधून मोठी कमाई केलेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी अमाप रक्‍कम घेऊन हे मंत्री नितीशकुमारांची प्रतिमा खराब करीत आहेत, असेही ज्ञानू यांनी म्हटले आहे.

  Pushing the image of good governance Big challenges for Nitish government