आता सरकारची खरी परीक्षा सुरू होईल; परीक्षेविना उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह!

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती.

    अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचप्रमाणे १०वीचा निकालही अंतर्गत मूल्यमापन आणि घेण्यात आलेल्या युनिट टेस्टच्या आधारे तयार करण्यात आला आहे. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परिणामी सीबीएसई आणि स्टेट बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर निश्चितच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होईल.

    परंपरागत पद्धतीने जेव्हा परीक्षा घेण्यात येत होत्या तेव्हा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी राहत नव्हती. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची स्मरणशक्‍ती आणि त्यांच्या विश्लेषण क्षमतेचे योग्य परीक्षण करण्यात येत होते. पूर्वी जास्तीत जास्त ६० ते ६५ टकके विद्यार्थी उत्तीर्ण होत होते, परंतु आता ९९ टक्के विद्यार्थी पास झाल्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटणे स्वाभाविकच आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश कुठे मिळेल ?

    ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल काय? कॉलेजमध्येही प्रवेशाची समस्या निर्माण होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण झाल्याचा आनंद होणे स्वाभाविकच आहे. परीक्षेविना उत्तीर्ण होणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखेच आहे.

    या प्रक्रियेमध्ये ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळालेले आहेत. परंतु नाराज ते विद्यार्थी आहेत की जे १०वी बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतरही १२वीच्या परीक्षेत तेवढेच गुण मिळण्याची अपेक्षा ठेऊन होते. मूल्यमापनावरून जो निकाल जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात. आता यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर कोरोना काळात परीक्षेविना उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असा शिक्का लागणार आहे. या निकालाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह लागलेले राहील, परंतु याशिवाय दुसरा पर्यायसद्धा नव्हता.

    Question marks on ability of students who have passed without examination