राजपक्षेंचा चौथा भाऊही सरकारमध्ये; श्रीलंकेत एकाच कुटुंबाचे सरकार

लोकांचे, लोकांकडून लोकांसाठी चालविण्यात येणारे शासन म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र लोकशाहीच्या या व्याख्येला तडा गेलेला आहे.

  लोकशाहीमध्ये आता ‘भाई-भतीजावाद’ फोफावला आहे. काही घराण्यांनी आता सरकारवर कब्जा केलेला आहे. मंत्र्यांची पत्नी, मुले-मुली, जावई हेच आता मंत्रिपदावर आरूढ झालेले दिसून येतात. घराणेशाहीने लोकशाही शासनव्यवस्थेला ग्रहण लावलेले आहे. याच्या समर्थनार्थ असे म्हटल्या जाते की, नेत्यांच्या मुला-मुलींना लहानपणापासून राजकारणाची जाणीव असते, कारण त्यांच्या घराण्याचा वारसाच राजकारणाचा असतो.

  जेव्हा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का होऊ शकत नाही ? यामुळे सामान्य जनतेचा राजकारणातील अधिकार संपुष्टात येत असतो, याची जाणीव या लोकांना नसते. घराणेशाहीच्या राजकारणामुळे लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांतांना पायदळी तुडविल्या जाते. जनतेतून नेते निर्माण होण्यापेक्षा नेत्यांना जनतेवर लादण्यात येते. यामुळे लोकशाही आणि राजेशाहीमध्ये फरकच राहिलेला आहे.

  एकाच कुटुंबातील व्यक्‍तींनी सत्तेवर कब्जा केल्यास त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. श्रीलंकेत तर कहरच झालेला आहे. तेथे राजपक्षे कुटुंबातील चौथा भाऊ बासिल राजपक्षे तेथील सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. श्रीलंकेत गोटबाया राजपक्षे राष्ट्रपती आहेत तर महिंदा राजपक्षे पंतप्रधान आणि चामाल राजपक्षे कृषिमंत्री आहेत. आता पुन्हा याच कुटुंबातील बासिल राजपक्षे यांनी अर्थमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  आता राजपक्षे कुटुंबातील ७ जण सरकारमध्ये आहेत. पंतप्रधान महिंदा यांचा मोठा मुलगा नमल क्रीडामंत्री आहेत तर कृषिमंत्री चामाल यांचा मुलगा शीशेंद्र राज्यमंत्री आहे. लोकशाहीची यापेक्षा मोठी थट्टा काय असू शकते? अमेरिका आणि श्रीलंका या दोन्ही देशांचे नागरिकत्व असलेल्या बासिल राजपक्षे यांनी तेथील लोकसभेची निवडणूकसुद्धा लढविलेली नाही, परंतु निवडून आलेल्या खासदारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश असून ते अप्रत्यक्षरित्या संसदेत पोहोचले आहेत.

  एकाच कुटुंबातील ७ सदस्यांपैकी ४ सख्खे भाऊ सरकार चालवित तर त्या सरकारला लोकशाही सरकार म्हणता येणार नाही. ही घराणेशाही आहे, असेच म्हणावे लागेल. अशा सरकारमध्ये जनतेचा आवाज ऐकल्या जाणार नाही. यामुळे हुकूमशाही निर्माण होईल आणि जनतेचे शोषण होईल.

  Rajapaksas fourth brother also in government One family government in Sri Lanka