रशियाची कोरोना प्रतिबंधक लस संशयाच्या विळख्यात

रशियाच्या संशोधन संस्थेने आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील या लसीच्या चाचणीचे आकडे वा अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक केलेला नाही, हे दोन टप्पे लस किती प्रभावशाली आणि सुरक्षित आहे, हे निश्चित करीत असतात.

जगातील सर्व देशांना मागे टाकत रशियाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस तयार केली आणि ती रजिस्टर्डदेखील केली. रशियाने लस बनविल्याच्या या दाव्याबद्दल मात्र अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. तथापि, रशियाचे स्वास्थ्य मंत्रालय आणि रेग्युलेटरी बॉडीने या लसीला मंजुरीही  दिली आहे. या लसीचे उत्पादन येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येईल आणि ऑक्टोबरमध्येही लस टिकाकरणासाठी उपलब्ध करण्यात येईल. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनीही असा दावा केला आहे की, सर्वप्रथम या लसीची प्रयोग मी माझ्या मुलीवरच केला. या लसीमुळे तीला आता बरे वाटत आहे. रशियाच्या या दाव्यावर शंका घेतली जात आहे. शास्त्रज्ञांनी या लसीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे की, कोणतीही लस तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात, परंतु रशियाने इतक्या लवकर ही लस कशी तयार केली. रशियाच्या संशोधन संस्थेने आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील या लसीच्या चाचणीचे आकडे वा अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक केलेला नाही, हे दोन टप्पे लस किती प्रभावशाली आणि सुरक्षित आहे, हे निश्चित करीत असतात. या लसीची चाचणी कमीत कमी ३० हजार लोकांवर व्हायला पाहिजे होती. परंतु चाचणीचे आकडे मात्र अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. या लसीची प्रयोग ज्यांच्यावर केला जातो. त्यांची नावे जाहीर करण्यात येतात, परंतु रशियाने आतापर्यंत कोणतीही नावे जाहीर केलेली नाही. रशिया शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे वागत होता, त्याच धर्तीवर सध्या रशियाची वाटचाल सुरु आहे. कोरोनावर लस निर्माण करण्याचा रशियाचा दावा शीतयुद्धाच्या वेळी जी पद्धत अवलंबिली होती त्याप्रमाणेच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे असेही बोलल्या जात आहे की, रशियाचा लसनिर्मितीचा दावा खराही असू शकतो. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वैद्यकीय चाचणीमध्ये ही लस शतप्रतिशत यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. ज्या लोकांवर या लसीचा प्रयोग केलेला आहे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. असेही रशियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रशियाने खरोखरच कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यामध्ये आघाडी घेतली आहे की, केवळ लस शोधल्याचा दावाच करीत आहे. इतक्या कमी वेळेत कोरोना प्रतिबंधक लस तयार करणे कोणत्याही देशाला खरोखरच शक्य आहे का? तसे तर रशियाने म्हटले आहे की, याच महिन्यात या लसीच्या आणखी ३ चाचण्या घेण्यात येतील.