आता तरी मोदी सरकार याला दाद देईल का? कोरोनाचे गंभीर संकट; संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करा

न्यायपालिका आणि कार्यपालिकेतील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असताना लोकशाहीचा तिसरा स्तंभ असलेल्या संसदेचे अधिवेशन मात्र होताना दिसत नाही.

    कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सुद्धा पंतप्रधान मोदी आणि राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना संसदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

    कोरोना महामारीच्या या कालखंडात सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत, त्या दुरूस्त करून कोरोनाचा सामना करण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. संसदेचे अधिवेशन घेण्यात आले तर जनप्रतिनिधींना जनतेचे प्रश्‍न सरकारपुढे मांडणे सोयीचे होईल. संसदेचे हे अधिवेशन ऑनलाईनही घेता येऊ शकेल. ब्रिटनमध्ये सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तेथील संसदेचे अधिवेशन घेण्यात आले होते. भारतात सुद्धा अशाप्रकारे संसदेचे अधिवेशन घेणे शक्‍य आहे.

    सध्या विविध राजकीय पक्षाचे नेते संसदेबाहेरच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यापेक्षा संसद सभागृहात मुद्दयांवर चर्चा होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या या संकटकाळात चर्चेसाठी संसदेची द्वारे खुली असली पाहिजे. संसद अधिवेशन सुरू नसल्यामुळे पंतप्रधानांकडून विरोधी पक्ष नेत्यांना त्यांच्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे मिळत नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानांना काही सूचना केल्या होत्या. परंतु, त्यांच्या सूचनांना पंतप्रधान मोदींनी उत्तर न देता केंद्रीय स्वास्थ्यमंत्री हर्षवर्धन यांनीच उत्तरे दिली.

    कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली आहेत, त्यानुषंगाने काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यानुषंगाने उत्तर दिले. अशी उत्तरे देण्याऐवजी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करून सभागृहातच समोरा-समोर चर्चा होणे गरजेचे आहे.

    serious crisis of the corona Hold a special session of Parliament nrvb