जळगाव मनपावर शिवसेनेचा झेंडा

महाराष्ट्राची सत्ता गमावल्यानंतर भाजपा राज्यात अनेक आघाड्यांवर कमजोर पडताना दिसत आहे. गेल्या महिन्यात सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा मिळविला तर आता जळगाव मनपाची सत्ता शिवसेनेने भाजपाकडून हिसकावून घेतली आहे.

    शिवसेनेच्या या विजयामुळे माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना जोरदार झटका बसला आहे. भाजपाचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांची पक्षात जी सातत्याने उपेक्षा करण्यात येत होती, त्याचे परिणाम आता पक्षाला भोगावे लागत आहे, असे राजकीय गोटात बोलले जात आहेत. खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकून राकाँमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणच बदलून गेले आहेत.

    जळगाव महापालिकेत बहुमत असल्यानंतरही भाजपाचा ‘पराभव करण्याची रणनीती एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अवघ्या १० दिवसात आखली आणि महापालिकेतून भाजपाची सत्ता हिरावून घेण्यास ते यशस्वी झाले. ७५ सदस्यीय जळगाव महापालिकेची ही निवडणूक शिवसेनेने ४५ विरुद्ध ३० अशा फरकाने जिंकली.

    महापालिकेत भाजपा हा अत्यंत मजबूत पक्ष आहे, त्यामुळे महापौर, उपमहापौर बिनविरोध निवडले जातील, अशी शक्‍यता वर्तविली जात असतानाच मागील आठवड्यात भाजपाच्या सदस्यांमध्ये फूट पडली. या फुटीचा शिवसेनेने लाभ घेतला. भाजपा नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या मदतीने शिवसेनेने भाजपाला जोरदार झटका दिला. शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन आणि उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.

    भाजपाने महापौरपदासाठी प्रतिभा ‘कापसे आणि उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांना मैदानात उतरविले. यात ओवैसी यांचा पक्ष ‘एआयएमआयएम ‘पाठीशी उभा राहिला. जळगाव मनपातील या विजयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. या यशामुळे आता आघाडीच्या नेत्यांनी हा जळगाव पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल, असे सूतोवाच केले आहे.