आजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ

कोरोना महामारीच्या या संकटामध्ये लोकांच्या जीवनाशी खेळ करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही लस टोचणाऱ्या टोळीने आपण कोकिळाबेन रुग्णालयातून आल्याचे नागरिकांना सांगितले. सोसायटीच्या नागरिकांनी लसीकरण प्रमाणपत्राची मागणी केली. प्रारंभी तर प्रमाणपत्र देण्यास या टोळीने टाळाटाळ केली.

    कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकं लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस लावून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना नकली लस टोचून अनेक जण पैसा कमावण्याचा धंदा करीत आहेत. ही केवळ फसवेगिरीच नाही तर लोकांच्या जीवनाशी खेळ करण्यात येत आहे. मुंबईच्या कांदिवली येथील हिराचंदानी इस्टेट सोसायटीने ३० मे रोजी कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते.

    या शिबिरात ३०० जणांना कोविशिल्ड लस असल्याचे सांगून त्यांचे लसीकरण करण्यात आले. १२६० रु. प्रतिलस या दराने नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात आले. या सोसायटीने ५ लाख रुपये लसीकरण करणाऱ्यांना दिले. ही लस टोचणाऱ्या टोळीने आपण कोकिळाबेन रुग्णालयातून आल्याचे नागरिकांना सांगितले. सोसायटीच्या नागरिकांनी लसीकरण प्रमाणपत्राची मागणी केली. प्रारंभी तर प्रमाणपत्र देण्यास या टोळीने टाळाटाळ केली, परंतु नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर वेगवेगळ्या रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र दिले. काही प्रमाणपत्रावर नानावटी रुग्णालय तर काही प्रमाणपत्र लाईफलाईन आणि बीएमसी लसीकरण केंद्राची नावे होती.

    जेव्हा नागरिकांना याबद्दल शंका आली, तेव्हा त्यांनी संबंधित रुग्णालयांशी संपर्क साधला. या रुग्णालयांनी असे कोणतेही लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आल्याचा इन्कार केला. अशा कोणत्याही शिबिरांशी आमच्या रुग्णालयांचा काहीही संबंध नाही, असे या रुग्णालयांच्या वतीने सांगण्यात आले. लसीकरण केल्यानंतर सोसायटीच्या नागरिकांना लसीकरण केल्याचा कोणताही मॅसेजसुद्धा आला नाही.

    इतकेच नव्हे तर लसीकरण करतानाचे छायाचित्र काढण्याससुद्धा या टोळीने नकार दिला. या संबंधीची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली. या टोळीने कोविशिल्डच्या नावावर नागरिकांना कोणती लस टोचली, याबद्दल कोणालाही माहिती नाही. ही लस हानिकारक तर ठरणार नाही? या टोळीने लोकांची फसवणूक केली आणि लसीकरणाच्या नावावर पैसेही उकळले. अशी फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    Sickness is also fruitful where is the sin of Fedal cheating in times of crisis Playing with public health by injecting fake vaccines