dhananjay munde

आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिला गुन्हेगार किंवा अपराधी म्हणता येणार नाही. तथापि एखाद्या व्यक्तिवर काही आरोप करण्यात आले तर त्या व्यक्तिची बदनामी मात्र होत असते व त्या व्यक्तिकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोनही बदलून जात असतो.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका पार्श्वगायिका युवतीने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. इ.स. १९९७ मध्ये इंदोर येथे आपल्या बहिणीच्या घरी मुंडेसोबत आपल्मा परिचय झाला होता. इ.स. १९९८ मध्ये मुंडे यांचा आपल्या बहिणीसोबत विवाह झाला. इ.स. २००६ मध्ये बहिणीच्या बाळंतपणासाठी मी इंदोरला गेले होते. तेथे मुंडे यांनी आपल्यावर अत्याचार केला. या घटनेचा व्हीडिओसुद्धा बनविण्यात आला व आपल्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला असा या युवतीचा आरोप आहे.

बॉलिवूडमध्ये गायिका बनविण्याचे आमिष देऊन मुंडे आपल्यावर अत्याचार करीत होते. या युवतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राकाँचे प्रमुख शरद पवार, खा. सुप्रिया सुळे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्विटरवरून यासंबंधीची तक्रार केली आहे. मुंडेंनी मात्र हे सर्व आरोप चुकीचे असून आपल्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, इ.स. २००३ पासून तक्रारकर्तीच्या बहिणीसोबत आपले संबंध होते. या संबंधांची माहिती आपली पत्नी, मित्र आणि कुटुंबीय मंडळींनाही होती. तिच्या बहिणीला एक मुलगाही असून त्या मुलांना आपले कुटुंबीय आपल्या कुटुंबाचा सदस्यच समजतात. ती आपल्या मुलाची आई असल्यामुळे तिची व मुलाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात असून याप्रकरणी समझोत्याचे प्रयत्न सुरू आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारच्या एका मंत्र्यावर हा गंभीर आरोप असल्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतीत काय निर्णय घेतात हेच आता बघायचे आहे. सरकारची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवणार आहेत की न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघणार ? खरं म्हणजे एखाद्या नेत्यावर गंभीर आरोप असला तर त्या नेत्याने स्वतःच ते ज्या पदावर असते त्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले पाहिजे.