चुकीचा इतिहास लिहून विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये

 इतिहास तथ्यावर आधारित असावा. इतिहास लिहिताना मनास वाटेल तसे लिहू नये. इतिहास चुकीचा कदापिही लिहू नये. काही इतिहास लेखक डाव्या विचारांचे असतात तर काही मोगल शासकांचे अंधभक्त आहेत! असे इतिहास लेखक इतिहासाची व्याख्याच चुकीच्या पद्धतीने करतात.

विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकातून खरी माहितीच देण्यात आली पाहिजे. खोटी आणि चुकीची माहिती जर इतिहासात लिहिली गेली तर एक संपूर्ण पीढीच चुकीच्या दिशेने वाटचाल करेल, याचे भान लेखकांनी ठेवायला हवे. एनसीईआरटीच्या १२ वी मध्ये शिकविण्यात येणारे ‘थिम्स ऑफ इंडियन हिस्ट्री-पार्ट २’ या पुस्तकात अतिशय निंदनीय आणि चुकीची विधाने करण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये युद्धात उद्धवस्त केलेली मंदिरे मोगलांनी पूर्ववत बांधून दिल्याचा उल्लेख आहे. हे विधान चुकीचे असून मंदिरे उद्धवस्त करून त्यातील देवी-देवतांच्या मूर्तीची तोडफोड करणारे मुस्लीम हल्लेखोर मंदिरांचे पुनर्निर्माण कसे काय करतील? मोगलांनी भारतावर ६०० वर्षे राज्य केले. या कालखंडात अयोध्या, मथुरा, काशी आणि सोमनाथ येथील मंदिरे उद्धवस्त करून मंदिरातील मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली.

या पुस्तकात मात्र मोगलांनी मंदिरे उद्धवस्त केली, परंतु त्यांनी ती पुन्हा बांधून दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मंदिराची तोडफोड करणारे पुन्हा मंदिरे कशी काय बांधून देतील? या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शिवांक शर्मा यांनी एनसीईआरटीच्या माध्यमातून याबाबत माहिती मागितली तेव्हा संबंधित विभागाकडे याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या पुस्तकाच्या २३४ व्या पृष्ठावर नमूद करण्यात आले आहे की, युद्धाच्या काळात मोगलांनी मंदिरे उद्धवस्त केली. परंतु, शाहजहान आणि औरंगजेबाने या उद्धवस्त मंदिराच्या पुननिर्माणासाठी अर्थसाहाय्य दिलेले आहे.

खरं म्हणजे मोगलसम्राट मूर्तिपूजेच्या विरुद्ध होते. त्यांना संपूर्ण देशात मोगल साम्राज्य प्रस्थापित करायचे होते. औरंगजेबांनी त्यांच्या शासनकाळात कित्येक मंदिरे उद्धवस्त केलेली आहेत. वेद आणि उपनिषदांचा सन्मान करणारा त्याचा मोठा भाऊ दारा शिकाह याची औरंगजेबाने हत्या केली होती. शुजा आणि मुरार या अन्य दोन भावांचीही त्याने हत्या केल्याचे इतिहासात आहे. वडील शाहजहान यांना तर त्याने आग्रा येथील किल्ल्यात कैद करून ठेवले होते. असा व्यक्‍ती मंदिरे तोडल्यानंतर पुनर्निर्माणासाठी कशी काय मदत करेल? इतिहास लिहिताना तथ्याचे योग्य परीक्षण करणे आवश्यक आहे. कोणतेही पुरावे नसतील तर त्या बाबींची इतिहासात नोंद करण्याचा उपद्र्याप करू नये.