sheetal amte

आत्महत्येच्या वेळी आनंदवनात त्यांचे पती आणि सासरे उपस्थित होते. आत्महत्येपूर्वी डॉ. शीतलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 'वॉर अँन्ड पीस' शीर्षकांची पेंटिंग पोस्ट केली होती.

स्वर्गीय बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय महारोग्यांची जी सेवा करीत आहे, ते खरोखरच महान कार्य आहे. बाबा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या कार्यांची देशातच नव्हे तर विदेशातही ख्याती आहे. या कुटुंबातीलच एक सदस्य स्व. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजारी यांची आत्महत्या दुर्दैवी तर आहेच परंतु जनमानसाला स्तब्ध करणारी आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे असा प्रश्‍न उपस्थित होतो की, सुशिक्षित आणि सेवाभावी कुटुंबातील या डॉक्टर युवतीने आत्महत्या का केली? डॉ. शीतल अशा कोणत्या तणावाखाली होत्या की, त्यांना हा तणाव सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून जीवनयात्रा संपविली ! हे सर्व प्रश्‍न रहस्यमय आणि अनुत्तरित आहेत. डॉ. शीतल यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांचे पिता डॉ. विकास आमटे आणि आई भारती आमटे हे हेमलकसा येथे होते.

हेमलकसामध्ये ते लोकबिरादरी या संस्थेचे काम सांभाळतात. डॉ. शीतल आमटे-करजारी या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. २० नोव्हेंबर रोजी डॉ. शीतलने आमटे परिवारातील सदस्यांवर सोशल मीडियावरून गंभीर आरोप केले होते, परंतु अर्ध्या तासानंतरच त्यांनी सोशल मीडियावरून हे आरोप काढून टाकले होते. यानंतर आमटे कुटुंबाच्या प्रमुखांनी एक पत्रक प्रसिद्ध केले अन त्यामध्ये डॉ. शीतल यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे म्हटले होते. याचा अर्थ आमटे परिवारामध्ये गृहकलह सुरू आहे.

आत्महत्येच्या वेळी आनंदवनात त्यांचे पती आणि सासरे उपस्थित होते. आत्महत्येपूर्वी डॉ. शीतलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘वॉर अँन्ड पीस’ शीर्षकांची पेंटिंग पोस्ट केली होती. डॉ. शीतलच्या आत्महत्येमुळे त्यांचे पती गौतम, मुलगा शर्बिल आणि आमटे परिवारावर मोठा आघात झाला आहे. त्या प्रतिभाशाली महिला होत्या. डॉ. शीतल यांनी इ.स. २००३ मध्ये नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्या हेमलकसा, आनंदवन आणि सोमनाथ येथील महारोगी सेवा संस्थांचा आर्थिक कारभार सांभाळत होत्या. या कार्याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लिडर’ म्हणून त्यांचा सन्मान केला होता.

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी लिडरशिपचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला होता. डॉ. शीतल स्व. बाबा आमटे यांचा सामाजिक कार्याचा वारसा चालवित होत्या. त्यांनी आनंदवनात स्मार्ट व्हिलेज, दिव्यांग आणि बेरोजगारांसाठी युवा ग्राम उपक्रम सुरू केले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कार्यामध्येसुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. शीतल यांच्या रहस्यमय आत्महत्येबद्दल संपूर्ण राज्यात शोक व्यक्‍त करण्यात येत आहे.