सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण संपुष्टात येणार

सुशांतच्या मित्रांनी त्याला ड्रग्जचे व्यसन लावले, त्याला विष देण्यात आले, गळा दाबून त्याची हत्या केली व नंतर फासावर लटकविण्यात आले, त्यांच्या बँक खात्यातून करोडो रुपये काढून घेण्यात आले. फार्महाऊसवर अभिनेत्रीसोबत दुर्व्यवहार करणे इत्यादी मनगढंत कहाण्या रंगविण्यात आल्या.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी (Sushant Singh’s suicide case) सीबीआय क्लोजर रिपोर्ट (CBI Closure Report) दाखल करुन या प्रकरणाची चौकशी कायमस्वरुपी बंद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कुशलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. परंतु शेवटी काय झाले? डोंगर पोखरुन उंदीर निघाल्यागत अवस्था झालेली आहे. या प्रकरणी अनेक दुरदर्शन चॅनल्सने आपली टीआरपी वाढविण्यासाठी अतिउत्साहाने हे प्रकरण लावून धरले होते. संपूर्ण बॉलिवूड जणू काही ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे अशी धारणा करुन देण्यात आली होती. शेवटी टीआरपी घोटाळा तर समोर आलाच. पैसे देऊन लोकांना संबंधित चॅनेल्स पाहण्यात सांगण्यात आले होते. हा सर्व प्रकार अराजसदृशच होता. इलेक्ट्रॉनिक मीडियाला नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे, हे यावरुन स्पष्ट झाले. सुशांतसिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली, असे वळण या प्रकरणाला देण्याचा प्रयत्न झाला. सुशांतसिंग हा चित्रपट अभिनेत्याचा मुलगा नसल्यामुळे त्याची कटकारस्थान करुन हत्या करण्यात आली. असा अभास निर्माण करण्यात आला. त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिता तर ‘विषकन्या’ स्वरुपातच सादर करण्यात आले. काही लोकांच्या मद्य व्यसनाला असे स्वरुप देण्यात आले की, जणू काही संपूर्ण चित्रपट उद्योगच या व्यवसनाच्या आहारी गेलेला आहे. सुशांतच्या मित्रांनी त्याला ड्रग्जचे व्यसन लावले, त्याला विष देण्यात आले, गळा दाबून त्याची हत्या केली व नंतर फासावर लटकविण्यात आले, त्यांच्या बँक खात्यातून करोडो रुपये काढून घेण्यात आले. फार्महाऊसवर अभिनेत्रीसोबत दुर्व्यवहार करणे इत्यादी मनगढंत कहाण्या रंगविण्यात आल्या. टीव्ही चॅनल्स या प्रकरणी जासूसी करुन वाटेल तसे प्रश्न विचारले. सुशांतला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली प्रतिमा खराब करण्याचे काम झाले. ज्या दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट उद्योगाची आधारशीला ठेवली, त्यांचेच नाव यानिमित्ताने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान कोरोना महामारी, चीनकडून देशाला होणारा धोका अर्थव्यवस्थेला आव्हाने या सर्व बाबी बाजूला सारुन सर्व फोकस सुशांत आत्महत्या प्रकरणावरच करण्यात आला. कोणतीही प्रकरण पुराव्याच्या आधारावरच सिद्ध करता येते, हे लक्षात घेण्यात आले नाही. आता हे प्रकरणच बंद करण्यात आलेले आहे. वृत्तवाहिन्या या प्रकरणातून काही धडा घेती काय?