स्वीडन पुन्हा चर्चेत बोफोर्सनंतर आता बस घोटाळा

राजीव गांधी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्या कार्यकाळात बोफोर्स तोफांचा खरेदी घोटाळा खूप गाजला होता.

    स्वीडनच्या एबी बोफोर्स कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या हावित्झर तोफा उत्कृष्ट दर्जाच्या होत्या. या तोफांचा बापर भारताने कारगिलच्या युद्धात केला होता. या तोफांनी भारताला कारगिल युद्धात विजय मिळवून दिला होता. या तोफांच्या खरेदीमध्ये मध्यस्थांना कमिशन देण्यात आल्याचा तत्कालीन सरकारवर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार सत्तेवर आले होते. बोफोर्स तोफा खरेदीमधील कमिशनची रक्‍कम कोणी गिळंकृत केली, याचा मात्र तपास लागला नाही.

    याप्रकरणी हिंदुजा बंधू आणि कवात्रोची यांची नावे चर्चेत आली. हिंदुजा बंधूंबर कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाही आणि कवात्रोची मलेशिया, इंग्लंड आणि अर्जेटिनामध्ये पळून गेला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आता पुन्हा याच धर्तीवर स्वीडनची ट्रक व बसनिर्माता कंपनी स्कैनियाचा घोटाळा पुढे आला आहे. या कंपनीने भारतातील ७ राज्यांना बसेस पुरविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी इ.स. २०१३ ते २०१६ दरम्यान मध्यस्थांना लाच दिली होती. या कंपनीच्या ट्रक आणि बसेसचा दर्जा जरी उत्तम असला तरी लाच देणे आणि स्वीकारणे हे बेकायदेशीर कृत्य आहे.

    यावरून हेच सिद्ध होते की, आपल्या देशात कोणतेही काम किंवा कंत्राट लाच दिल्याशिवाय मंजूरच होत नाही. स्कैनिया कंपनीचे सीईओ हेनरिक हेनरिक्सन यांनी लाच दिल्याचे मान्य केळे आहे. आम्ही भारतासोबतचे हे मोठे कंत्राट मिळविण्यासाठी उत्सुक होतो व त्यासाठीच आम्ही लाच दिलेली आहे. भारतातील ज्या लोकांनी ही चूक केली होती त्यांनी आता ही कंपनी सोडून दिली आहे आणि जे व्यावसायिक भागीदार होते त्यांनी हा कंत्राटच रद्द केलेला आहे.

    कंपनीवर लाचखोरीचा आरोप लागल्यानंतर स्कैनियाने भारतीय बाजारात या बसेस विकणे बंद केलेले आहे आणि या बसेसचा कारखानाही बंद केला आहे. कंपनीने या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केळे आहे. यामध्ये १.८ कोटी डॉलरचा करार करण्यात आल्याची कंपनीने कबुली दिली आहे. स्वीडन, जर्मन आणि भारतीय मीडियानुसार भारताच्या एका मंत्र्याला या सौद्यमध्ये लाच देण्यात आली होती, परंतु त्यांचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.