तबलिगींच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पश्चाताप करण्यास सांगितले आहे. न्या. नलावडे आणि न्या.एम.जी सेवलीकर यांच्या खंडपीठाने ३ वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना म्हटले आहे की, सरकार वेगवेगळ्या देशातील नागरिकांसोबत वेगवेगळा व्यवहार करु शकत नाही.

तबलिगी जमातसाठी भारतात आलेल्या २९ विदेशी नागरिकांविरुद्ध कोरोना परसविण्याचा ठपका ठेवत दाखल करण्यात आलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले असून याप्रकरणी राज्य सरकारला फटकारले आहे. या लोकांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधानंतर या विदेशी नागरिकांवर जी कारवाई करण्यात आली ती खरं म्हणजे भारतीय मुसलमानांना इशाराच होता. न्या.टी.व्ही. नलावडे यांनी म्हटले आहे की, जेव्हा एखादी महामारी येते, तेव्हा सरकार एखादा बळीचा बकरा शोधत असते. या विदेशी नागरिकांवर भारतीय दंडसंहिता, महामारी अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, विदेशी नागरिक अधिनियम आणि आपात्कालिन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व लोक दिल्ली येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे आले होते. या विदेशी आणि भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गडबड केलेली नाही. या लोकांबाबत मीडियाने उलट-सुलट प्रचार चालविला. भारतामध्ये कोरोना पसरविण्यास हे विदेशी नागरिकच जबाबदार आहेत, असाही प्रचार करण्यात आला. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पश्चाताप करण्यास सांगितले आहे. न्या. नलावडे आणि न्या.एम.जी सेवलीकर यांच्या खंडपीठाने ३ वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करताना म्हटले आहे की, सरकार वेगवेगळ्या देशातील नागरिकांसोबत वेगवेगळा व्यवहार करु शकत नाही. भारतातील एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक सहिष्णुता आवश्यक आहे. राज्य सरकारने राजकीयदृष्ट्या ही पावलं उचललेली आहेत. या याचिका इराण, आयवरी कोस्ट, घाना, तंजानिया, बेनिन, इंडोनेशिया, जिबूती येथील मुस्लिम जमातींनी दाखल केल्या होत्या. ते भारत सरकारने त्यांना जो व्हिसा दिलेला होता, त्या व्हिसावरच ते भारतात आले होते. भारतीय संस्कृती, येथील आदरातिथ्य आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ते येथे आले होते. विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली होती. जेव्हा तपासणी निगेटिव्ह आली, तेव्हाच त्यांना शहरात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांनी तबलिगींच्या विरोधात कारवाई करताना कोणताही विचार केला नाही, कोणतेही पुरावे नसताना त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली.