पायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली

राजकारणामध्ये फोन टॅप करणे ही काही नवीन बाब नाही. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आपला फोनवरील वार्तालाप टॅप केला जाईल अशी भीती वाटत होती. आणीबाणी लागू झाल्यानंतर तर अनेक मंत्र्यांनी फोन टॅपिंगची धास्तीच घेतली होती.

    देशातील अनेक राज्यांमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जातात, असे मुद्दे वारंवार चर्चेत आलेले आहेत. जेव्हा पक्षात फूट पडते किंवा बंडखोरी होते, तेव्हा बंडखोरांचे फोन टॅप केले जातात. नेत्यांमध्ये अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले की, अशी परिस्थिती निर्माण होते. काँग्रेसमध्ये जुन्या आणि नवीन नेत्यांमध्ये स्पर्धा आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वातावरण आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना पुढे करून काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. काँग्रेसला मोठा विजयसुद्धा मिळाला. परंतु, जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा पायळटऐवजी अनुभवी नेते अशोक गहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्यात आली.

    पोटनिवडणुकीत गहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला तेव्हा पायलटमुळेच त्यांचा पराभव झाल्याचा आरोप करण्यात आला. गहलोत आणि जै पायलट यांचे आपसात मुळीच पटत नाही आणि या दोन्ही नेत्यांमधील असंतोषाचा लाभ घेऊन पायलट यांना भाजपामध्ये आणण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले, परंतु ‘ऑपरेशन लोटस’ अपयशी ठरले. सचिन पायलट यांना प्रियांका गांधींनी समजावले. आता ८ महिन्यांनंतर गहलोत सरकारने याची कबुली दिली की, गेल्या वर्षी जुलै महिन्यात सचिन पायलट यांच्या गटाने जी बंडखोरी केली होती, त्यावेळी मोदी सरकारमधील एक मंत्री आणि काँग्रेस आमदारांचा फोनवरील वार्तालाप टॅप करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपावर काँग्रेस आमदारांची खरेदी करण्यात येत आहे, असा आरोप केला होता.

    हा मुद्या पुढे आल्यानंतर ऑगस्ट २०२० च्या विधानसभा अधिवेशनात माजी शिक्षणमंत्री काळीचरण सराफ यांनी फोन टॅपिंगच्या बाबतीत प्रश्‍न उपस्थित केला होता. जर फोन टॅप करण्यात आले असेल तर कोणत्या नियमांतर्गत आणि कोणाच्या आदेशावरून फोन टॅपिंग केली होती? भाजपा आणि बसपानेही गहलोत सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. यावर गहलोत सरकारच्या वतीने असे उत्तर देण्यात आले होते की, सक्षम स्तरावर मंजुरी घेतल्यानंतर फोन टॅप करण्यात आले होते.