‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला? सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल! असं वागणं मोदींना भारी पडू शकतं

पंतप्रधान नोंद्र मोदी यांची काम करण्याची पद्धत ही सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याची कधीही राहिलेली नाही. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाही मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत चर्चा न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आपले निर्णय सांगत होते व त्यांच्यावर या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवून देत होते.

    देशाच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांची कामकाजाची पद्धत अशीच आहे. ते सर्व निर्णय स्वतःच घेतात. पंतप्रधानपदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केवळ सरकारच नाही तर पक्षसुद्धा त्यांच्या दिशानिर्देशानुसार चालत होता. परंतु आता मोदींच्या कार्यपद्धतीमध्ये बदल जाणवू लागला आहे. एवढ्यात तर ते त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या सारख्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी मंत्रिमंडळाच्या ४-५ बैठकाही घेतल्या.

    संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि भूपृष्ठ दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी अनेक मुद्दयावर चर्चा केली. यावरून असे वाटते की, मोदी कुठल्यातरी दबावात आहेत. कारण या दोन्ही मंत्र्यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहेत. रा.स्व. संघामध्येही या दोन्ही मंत्र्याचा चांगलाच प्रभाव आहे. बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आलेले अपयश तसेच मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये पक्षांतर्गत जी गटबाजी सुरू आहे, त्यामुळे ‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला आहे, असे राजकीय गोटात बोलल्या जात आहे. याशिवाय कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये जे मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे मोदींची प्रतिमा मलिन झालेली आहे.

    भाजपचे पितृसंगठन असलेल्या रा.स्व. संघानेही मोदींना असा सल्ला दिला आहे की, संकटकाळात जनतेचा आक्रोश वाढलेला असतो आणि अशावेळी ‘सहकाऱ्यांमधील असंतोष वाढता कामा नये म्हणून सरकार, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाची जी जुनी परंपरा आहे, त्याचे पालन केले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील ‘सहकाऱ्यांसोबत चर्चा केली पाहिजे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि त्यावर अंमलबजावणी करायला हवी. असे केले तर सरकारमधील असंतोष आणि जनतेचा आक्रोश कमी करता येईल. अशी कार्यपद्धती अवलंबिली तर मंत्री सुद्धा जनतेमध्ये जाऊन सरकारची बाजू योग्यरित्या मांडू शकेल.

    The influence of Brand Modi began to wane Modi has to listen to his colleagues now Doing so could cost Modi dearly