काय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना भाजपा सक्रिय राजकारणात ठेवत नाही. त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत करण्यात येते. येदिंचे वय ७८ वर्षे आहे.

    भाजपासाठी येदियुरप्पा अडचणीचे ठरत असल्यामुळे त्यांना आज ना उद्या मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावेच लागेल. कर्नाटकमधील भाजपाचे काही बंडखोर नेते येदियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. काही वर्षांपूर्वी भाजपाचे नेते बेल्लारीचे खाण माफिया रेड्डी बंधूसोबत येदियुरप्पाचे साटेलोटे असल्याचा आरोप करीत होते. इतके सारे असतानासुद्धा राजकीय मजबुरीमुळे भाजपाला येदिंना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवावे लागत आहे. परंतु आता मात्र भाजपाला येदियुरप्पा डोईजड झालेले आहेत.

    आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका आहे, हे लक्षात घेऊन येदिंनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली. दुसरा मुद्दा असाही आहे की, ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना भाजपा सक्रिय राजकारणात ठेवत नाही. त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत करण्यात येते. येदिंचे वय ७८ वर्षे आहे.

    या महिन्याच्या अखेरीस येदियुरप्पा कर्नाटकातील भाजपा आमदारांची आयोजित करून, या बैठकीत ते मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करतील, असे बोलल्या जात आहे. येत्या २६ जुलै रोजी येदियुरप्पा सरकारला २ वर्षे पूर्ण होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

    भाजपा एका झटक्यात येदिंना मुख्यमंत्रिपदावरून दूर करू शकते, परंतु कर्नाटकमधील प्रभावशाली लिंगायत समाजाचे ते नेते आहेत. येदिंना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यामुळे लिंगायत समाज भाजपापासून दूर जाऊ नये, याचा विचार भाजपा करीत आहे. ४ वेळा येदियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले आहेत. इ. स. २०१३ मध्ये येदिंनी जेव्हा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता, तेव्हा भाजपाची मोठी “व्होट बँक’ ते स्वतः सोबत घेऊन गेले होते. त्यानंतर मात्र पुन्हा ते भाजपामध्ये परतले.

    गेल्या ५ दशकांपासून येदियुरप्पा कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि ते रा. स्व. संघासोबतही जुळलेले आहेत. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर होण्यासाठी ३ अटी ठेवलेल्या आहेत. येदिंचा मोठा मुलगा राघवेंद्र यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात यावे, लहान मुलगा विजयेंद्र यांना कर्नाटक सरकारमध्ये मंत्रिपद बहाल करण्यात यावे आणि ते म्हणतील त्या नेत्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करावी, या त्यांच्या तीन अटी आहेत. यातील एखादी मागणी पूर्ण करून भाजपा येदिंपासून स्वतःची सुटका करून घेतील, असे वाटते.

    The issue of removal from the post of Chief Minister BJPs problem due to Yeddyurappa