चीनने घुसखोरी केल्याचे संरक्षण मंत्रालयाने केले मान्य

  • काँग्रेस नेते राहूल गांधीच्या वक्तव्यावर कोणीही विश्वास ठेवित नाही, परंतु राहूलने संरक्षण मंत्रालयाच्या अहवालाचा दाखला देऊन प्रश्न उपस्थित केला आहे की, पंतप्रधान खोटे बोलत आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

जे सत्य आहे ते स्वीकारलेच पाहिजे. चिनी सैनिक एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत घुसले आहे. दोन्ही देशादरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावर यानुषंगाने प्रदीर्घ चर्चा झाली. परंतु चिनी सैनिक मात्र मागे हटण्यासाठी तयार नाहीत. गलवान खोऱ्यांमध्ये चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये तुरळक कारवायासुद्धा झाल्या. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, कोणीही भारतीची एक इंच जमीनसुद्धा हडप करु शकत नाही, परंतु हे खरे आहे काय? काँग्रेसची स्थिती मागील ६ वर्षांपासून सतत कमजोर होत आहे. काँग्रेस नेते राहूल गांधीच्या वक्तव्यावर कोणीही विश्वास ठेवित नाही, परंतु राहूलने संरक्षण मंत्रालयाच्या अहवालाचा दाखला देऊन प्रश्न उपस्थित केला आहे की, पंतप्रधान खोटे बोलत आहे. संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, ५ मे नंतर चीन एलएसीवर सतत आक्रमण करीत आहे. मे महिन्यापासून चीन भारतीय हद्दीत सातत्याने घुसखोरी करीत आहे. लडाखमधील गलवान खोरे, पँगोगत्सो, गोगरा आणि हॉटस्प्रिंग या विभागात चीन सैन्य घुसलेले आहेत. राहुल गांधी यांनी या अहवालाचा आधार घेऊन म्हटले आहे की, चीनचा मुकाबला करणे ही तर दूरची गोष्ट आहे, परंतु पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये चीनचे नाव घेण्याचीही हिंमत नाही. आता संरक्षण मंत्रालयाने वेबसाईटवर टाकलेला अहवाल मागे घेतला आहे, परंतु जे सत्य आहे ते कसे बदलणार? चीनचे धोरण विस्तारवादाचे आहे. कोरिया, मंगोलिया, तुर्कमेनिस्तान, व्हिएतनाम आणि जपानच्या बऱ्याच भूभागावर चीनने कब्जा केलेला आहे. इ.स. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. १९६२ च्या युद्धानंतर भारताचे तत्कालिन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी चीनसोबक ‘पंचशील’ करार केला होता. परंतु चीनने या करारानंतरही भारतासोबत दगाबाजी केली. याचा विपरीत परिणाम पंडित नेहरुंच्या स्वास्थ्यावर पडला आणि दोन वर्षानंतर पंडित नेहरु यांचे निधन झाले. जमिनीसोबतच समुद्रही चीन ताब्यात घेऊ पाहत आहे. फिलिपाईन्स, इंडोनेशिया इत्यादी देशांना भीती दाखविण्याचे काम चीन सातत्याने करीत आहे. एलएसीवर अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. भारताने पँग त्सो विभागातील फिंगर-३ च्या धानसिंह थापा पोस्पमधून आपले सैन्य मागे घ्यावे, असे चीनला वाटते. परंतु भारताने या क्षेत्रातून सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे.