पुन्हा होऊ शकेल काय शिवसेना-भाजपा युती?

महाराष्ट्राच्या सत्तेकडे भाजपाचे लक्ष्य लागलेले आहे, परंतु त्यांचे 'ऑपरेशन लोटस' मात्र यशस्वी होताना दिसत नाही.

    मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीवर आपले वर्चस्व असावे, यासाठी भाजपा उतावीळ झालेला आहे. पूर्वीप्रमाणे शिवसेनेसोबत युती करून सरकार स्थापन करावे, असे भाजपाला सतत वाटते आहे. दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी असल्यामुळे उभयांमध्ये युती व्हावी आणि महाराष्ट्रात युतीची सत्ता असावी, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. गेल्या महिन्यात जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रतिनिधी मंडळासोबत दिल्लीला गेले होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बंदद्वार चर्चा झाली.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि शाह यांच्या घरूनच पंतप्रधान मोदींसोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. शिवसेना खासदार संजय राऊत हे दिल्ली येथे भाजपाच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावरून असे वाटते की, उभय पक्षांमध्ये यानुषंगाने निश्चितच काहीतरी घडामोडी होत आहेत.

    फडणवीस यांनीही असे म्हटले आहे की, शिवसेना आमचा शत्रू नाही. आमच्यामध्ये वैचारिक आहेत, परंतु राजकारणामध्ये काहीही स्थायी नसते. यावरून हे स्पष्ट होते की, शिवसेना भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवून राज्यामध्ये युती सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न होत आहे. जर यानुषंगाने ताळमेळ बसला तर केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेण्याचा विचार पुढे येऊ शकतो.

    मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये शिवसेना सदस्यांना सहभागी करून घेण्यासाठी आयबीकडे संभावित मंत्र्यांची नावे देण्यात आलेली आहेत, असेही बोलल्या जात आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकार ‘पाडण्यासाठी भाजपा आपला जुना सहकारी पक्ष शिवसेनेकडे अपेक्षा ठेवून आहे. तथापि, शिवसेनेच्या सदस्यांची केंद्रीय एजन्सी जी चौकशी करीत आहे, त्याबद्दल मात्र शिवसेना त्रस्त आहे. तिकडे राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे.

    जर पुन्हा शिवसेना-भाजपा युती झालीच तर उद्धव ठाकरेंना याचा काय फायदा होईल ? ते अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एवढे मात्र खरे की, शिवसेनेचे काही नेते केंद्रीय मंत्री होईल आणि चौकशी संस्थांचा त्यामागील ससेमिरा कमी होईल. राज्यातील निनिध योजनांसाठी केंद्राची मदत मिळविणे सोयीचे होईल. राजकारण कोणत्या दिशेने वळण घेईल, हेच आता बघायचे आहे.