येथे तरी नैतिकता असायलाच हवी, राममंदिर ट्रस्टचा घोटाळा चिंताजनक!

जे लोक परमेश्वराच्या नावावर घोटाळे करतात, अशा लोकांनी गुडघाभर पाण्यात डुबून मेलेळेच बरे. सर्वव्यापी परमेश्वराचे प्रत्येक व्यक्‍तीच्या कामावर लक्ष असते.

    परमेश्वरापासून काहीही लपवून ठेवता येत नाही. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजयसिंह यांनी राममंदिर ट्रस्टवर असा आरोप केला आहे की, ट्रस्टने राममंदिराच्या बांधकामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. तेथील कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांची ५ कोटी ८० लाखांची जमीन सुल्तान अंसारी आणि रविमोहन तिवारी यांनी केवळ २ कोटीमध्ये खरेदी केलेली आहे.

    या सौद्याचे साक्षीदार अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि मंदिराच्या ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आहेत. त्यानंतर लगेच ही जमीन चंपत राय यांनी राममंदिर ट्रस्टच्या नावांवर १८ कोटी ५० लाखांमध्ये सुल्तान अंसारी आणि रविमोहन तिवारीकडून खरेदी केली. या व्यवहारांचे अनिल मिश्रा आणि ऋषिकेश उपाध्याय पुन्हा साक्षीदार बनले. खासदार संजयसिंह यांनी थेट आरोप केला आहे की, हे सरळ सरळ सावकारीचे प्रकरण आहे.

    या व्यवहारात काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. या सौद्यामध्ये सर्व नियम व कायदे धुडकावून घोटाळा झालेला आहे. या प्रकरणात काँग्रेस पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हटले आहे की, ‘हे प्रभू कसे दिवस पाहायला मिळत आहेत. प्रभू तुमच्या नावावर वर्गणी वसूल करून त्यामध्ये घोटाळा करीत आहेत.’ माजी केंद्रीय मंत्री तृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे की, या लोकांनी प्रभू रामालाही सोडले नाही, आता शिल्लकच काय राहिले? मोदी आहे तर सर्वच शक्‍य आहे’.

    याबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, राममंदिर ट्रस्टमधील घोटाळ्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. रा. स्व. संघाच्या प्रमुखांनी याबाबत खुलासा केला पाहिजे. दुसरीकडे राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे की, चुकीचे आरोप करणाऱ्यांवर न्यायालयात खटला दाखल केला पाहिजे. महंत राजुदास यांनी म्हटले आहे की, घोटाळ्याचा आरोप सिद्ध झाला नाही तर संजयसिंह यांच्यावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करू. या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती पुढे आणण्याची गरज आहे. मंदिरासाठी जी वर्गणी गोळा केली जाते, ती वर्गणी चेकद्वारेच घेतली पाहिजे व त्याच्या पावत्या दिल्या पाहिजे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.

    There must be morality here, Ram Mandir Trust scam is worrisome