शरद पवारांना शह सरकार चालविण्याचा उद्धव ठाकरेंचा दावा

सरकार (Government) मीच चालवितो असे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री कधीही सांगत नसते, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मात्र राज्याचे सरकार मी स्वतः चालवितो असे म्हटले आहे. अखेर त्यांना असे सांगण्याची का गरज भासली असावी? राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे, हे सर्वांनाच माहित आहे.

या सरकारमध्ये काँग्रेस (Congress) आणि राकाँ (NCP) हे पक्षसुद्धा सहभागी आहेत. राज्यातील दिग्गज नेते शरद पवार यांचे या सरकारला नेहमीच मार्गदर्शन असते किंबहुना ‘महाविकास आघाडीचे तेच सूत्रधार आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजकारणातला अनुभव आणि त्यांचे राजकीय डावपेच हे महाविकास आघाडी सरकारची मोठी शकती आहे. तथापि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतेच असे विधान केले आहे की, सरकार आणि कार मी स्वतःच चालवित असतो. असे म्हणून त्यांनी शरद पवारांना एकप्रकारचा शह दिला आहे.

याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की, सरकारचा कर्ताधर्ता मी स्वतःच आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी मला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले की, मी कोणालाही विचारून निर्णय घेत नसतो. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री फार चांगल्याप्रकारे कार चालवितात, परंतु ते जेव्हा कार चालवित असतात तेव्हा रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक मात्र थांबून जाते.

फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हटले आहे की, भाजप महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. याउलट शिवसेनेने म्हटले आहे की, भाजपला राज्यातील जनतेने नाकारले असून ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून हे स्पष्ट झालेले आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरीही सहभागी झालेले आहेत. शेतक-यांनी भाजपला नाकारून पंजाब आणि हरयाणाच्या शेतक-यांना पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये कितीही ‘तू-तू – मैं मै’ झाली तरी जनतेला मात्र हे ठाऊक आहे की, राज्यातील महाआघाडी सरकारचे शरद पवार हेच शिल्पकार आहेत. शरद पवारांमुळे राज्यात भाजप माघारला आहे.