Sarbananda Sonowal Himanta Biswa Sarma

बिहार आणि बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणीही उमेदवार नव्हता, परंतु आसामची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आसाममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाकडे २ नेते आहेत.

    या दोघांपैकी कोणाकडे राज्याचा कारभार सोपवायचा असा पेच भाजपाला पडला आहे. तेथे सर्बानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा सरमा हे दोघेही ज्येष्ठ नेते आहेत. सरमा लोकप्रिय नेते आहेत. आसाममधील भाजपाच्या विजयाचे श्रेयसुद्धा सरमा यांनाच दिल्या जाते. हेमंत बिस्वा सरमा हे प्रभावशाली नेते असून विधानसभा निवडणुकीत ते प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक लाख मते जास्त मिळवून विजयी झालेले आहेत. राज्यातील बहुतांश मतदारसंघात त्यांनी भाजपा उमेदवारांचा प्रचार केलेला आहे.

    राज्यातील बहुतांश भाजपा आमदार आणि कार्यकर्त्यांना सरमा हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. भाजपाने सोनोवाल आणि सरमा या दोन्ही नेत्यांना निवडणुकीत पुढे केले होते. परंतु सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नव्हते. आसाममधील भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना असे संकेत दिले आहेत की, सर्बानंद सोनोवाल यांच्याऐवजी हेमंत बिस्वा सरमा यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद दिले तर पक्षांतर्गत विद्रोह होऊ शकतो. सोनोवाल यांच्या सरकारमध्ये सरमा शिक्षण व अर्थमंत्री राहिलेले आहेत. सरमा काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत. यासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार आहेत. सरमा जेव्हा आसामच्या परिस्थितीवर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते, तेव्हा सोनिया आणि राहुल गांधी यांनी सरमांना २ दिवसपर्यंत वेळच दिला नाही. त्यांची उपेक्षा करण्यात आली. या उपेक्षेतूनच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला.

    आता तर काँग्रेसकडे कोणताही जननेता नाही. आसामचे चहा उत्पादक क्षेत्र एकेकाळी काँग्रेसचा गड होता. या क्षेत्रावर काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता, परंतु आता मात्र या क्षेत्रावर भाजपाने आपला प्रभाव वाढविला आहे. सीएएच्या बाबतीतही काँग्रेसची दुटप्पी भूमिका होती. काँग्रेसने ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात सीएएला विरोध केला होता तर बराक खोऱ्यात याप्रकरणी काँग्रेस मौन होती.

    तथापि, भाजपा पक्षश्रेष्ठींना असा विश्‍वास आहे की, सरमा यांची आसामच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली नाही तरी ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण ते काँग्रेस नेतृत्वावर सतत टीका करीत होते.