आता ताकद दाखवावीच लागेल! २०२४ च्या निवडणुकीकडे लक्ष विरोधी पक्षांचा सर्वमान्य नेता कोण राहील?

विरोधी पक्षाकडे असे कोणतेही प्रभावशाली नेतृत्व नाही की, जे पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकेल.

    सत्ता मिळविण्यासाठी विरोधी पक्ष आतुर झालेले आहेत व त्यासाठी ते कोणत्याही प्रकारे का होईना आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. येनकेनप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा इ. स. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव करणे हे विरोधकांचे एकमेव उद्दिष्ट आहे. खरं म्हणजे एनडीएसुद्धा पहिल्यासारखे एकजूट राहिलेले नाही. एनडीएमधून शिवसेना आणि अकाली दल बाहेर पडलेले आहेत.

    एनडीवर आता केवळ भाजपाचेच वर्चस्व आहे. इ. स. २०१४ आणि त्यानंतर इ. स. २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर मोदी सरकारने स्वतःचे वर्चस्व स्थापित केले आहे. पक्षाकडे असे कोणतेही प्रभावशाली नेतृत्व नाही की, जे पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकेल. यानंतरही काँग्रेस, राकाँ, शिवसेना, टीएमसी, द्रमुक, राजद, डावी आघाडी आणि झामुमोसह १९ विरोधी पक्षांनी इ.स. २०२४ पर्यंत मजबूत पर्याय स्थापन करण्याचा निर्धार केला आहे.

    राकाँ नेते शरद पवारांनाही आता कळून चुकले आहे की, काँग्रसला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्षांची एकजूट मजबूत होणारच नाही कारण भाजपानंतर काँग्रेस पक्षच देशातील सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु आता असा प्रश्‍न उपस्थित होतो की, काँग्रेस पक्ष दुसर्‍या कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याला खुल्या मनाने स्वीकारतील काय? आणि असे झालेच तर राहुल गांधींचे राजकीय भविष्य कसे राहील ?

    विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी शरद पवारांना नेते म्हणून स्वीकारले तर पवार विरोधी पक्षांचे नेतृत्व करतील काय ? तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी गैरभाजपा विरोधी पक्षाच्या सर्वमान्य नेत्या होऊ शकतील काय? बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर निश्चितच ममता बॅनर्जी यांचे राजकीय वजन वाढलेले आहे, परंतु बंगाल वगळता अन्य राज्यातील जनता ममताला स्वीकारतील काय?

    पंतप्रधान मोदी यांची ज्याप्रमाणे हिंदी भाषेवर कमांड आहे, त्याचप्रकारचा नेता विरोधकांना हवा आहे. देवेगौडा यामुळेच अपयशी ठरले की, देशाची संपर्क भाषा हिंदी त्यांना बोलता येत नव्हती. विरोधी पक्षांनी पहिल्यांदा एकजूट करावी व नंतरच नेतृत्वाचा निर्णय घ्यावा, परंतु देशातील जनतेला मात्र मोदींना पर्यायी विरोधी नेता हवा आहे. विरोधी पक्षांकडे मात्र आजतरी असा कोणताही नेता नाही.