‘कोरोना महामारीमध्ये राष्ट्रपती’ देशभर का फिरत आहेत!

कोरोना महामारी लक्षात घेता सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. खासकरून कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे सांगण्यात येत आहे. परंतु देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोरोनाच्या या काळातच देशभर फिरत आहेत.

    हा नियम केवळ जनतेसाठीच आहे का? जनतेसाठी एक नियम आणि राष्ट्रपती किंवा राजकीय नेत्यांसाठी वेगळा नियम असतो का ? नुकतेच राष्ट्रपती कोविंद ओडिशाच्या तीन दिवसाच्या दौर्‍यावर होते. भगवान जगन्नाथ मंदिरात जाऊन त्यांनी पूजा-अर्चनासुद्धा केली. यापूर्वीही राष्ट्रपतींनी देशातील विविध राज्यांचे दौरे केले. कोरोना महामारीच्या या काळामध्ये राष्ट्रपती देशभर का फिरत आहेत? असा प्रश्‍न देशातील सामान्य नागरिक विचारत आहेत.

    आपण थोड्या वेळासाठी असे समजू या की, राष्ट्रपती स्वतः सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या दौऱ्यांची व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. राज्याचे नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी या सर्वांना राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी सक्रिय व्हावे लागते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यांमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही उपस्थित असतात. इतकेच नव्हे तर राज्याचे कित्येक मंत्रीही राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासोबत असतात. अशा परिस्थितीत कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असते.

    याचप्रकारे ज्या राज्यांमध्ये. विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या राज्यांमध्ये कित्येक कार्यकर्ते व रॅलीतील लोक विनामास्कचेच असतात. या नेत्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी वाटत नाही. रॅलीमध्ये सहभागी लोकांना व कार्यकर्त्यांना हे नेते मास्क लावून येण्याचे आवाहनसुदधा करीत नाहीत. खरं म्हणजे ज्या नेत्यांच्या समर्थनार्थ लोक रॅली काढतात, त्या नेत्यांनी रॅलीतील लोकांना मोफत मास्क वितरण करायला पाहिजे. रॅलीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला असतो. लवकरच हरिद्वार येथे कुंभमेळा होणार आहे.

    यामध्ये हजारो-लाखो लोक सहभागी होतील. उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या श्रद्धाळूंना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले होते, परंतु विद्यमान मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय बदलला आणि प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले. अशा प्रकारामुळेच कोरोना आणखी वाढू शकतो.