आता तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठी विचार करतील काय? आजमितीला सर्वांना सोबत घेऊन चालणेच पक्षाच्या हिताचे आहे

काँग्रेसच्या निवडणुकीतील अपयशाबद्दल देशातील जनतेने जे मत व्यक्‍त केलेले आहे, त्या मतांशी काँग्रेसच्या समीक्षा पॅनलने सहमती दर्शविली आहे. देशातील ५ राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा उमेदवारांची निवड करताना पक्षांतर्गत जी भांडणे झाली, त्याचा परिणाम आहे असे मत या पॅनेलने नोंदविले आहे. या पॅनेलचा अहवाल आता बाजूला ठेवला जाईल का? पक्षांमध्ये जर अंतर्गत भांडणे आहेत तर त्यांचे मुख्य कारण पक्षामध्ये बेशिस्त आहे, हेच आहे.

    आता असा प्रश्‍न निर्माण होतो की, पक्षांतर्गत कलह आणि गटबाजी कोणी निर्माण केली? पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी राज्यातील कोणत्याही लोकप्रिय नेतृत्वाला पुढे येऊच दिले नाही. हे नेतृत्व जर पुढे आले तर ते आपल्यालाच आव्हान देईल, अशी भीती केंद्रीय नेतृत्वाला वाटत होती. पक्षातील प्रादेशिक नेतृत्वाला कमजोर करण्याचे प्रयत्न केंद्रीय नेतृत्वाकडून होत आहे. काँग्रेसमध्ये एकमेकांचे पाय ओढणाऱ्या नेत्यांची कमतरता नाहीच.

    ज्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, ते नेते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करत असतात. काँग्रेस पक्षात हे दीर्घकाळापासून चालत आलेले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्योतिरादित्य शिंदे आणि हेमंत बिस्वा सरमा या नेत्यांची उपेक्षा केली आणि त्याचा परिणाम काँग्रेस भोगतच आहे. पक्ष आतातरी प्रादेशिक नेतृत्वाला महत्त्व देणार आहे का? कोणत्याही आघाडीमध्ये दूरदर्शीपणा नसतो.

    बंगालमध्ये काँग्रेसने उशिरा का होईना डाव्या पक्षांसोबत निवडणूक आघाडी केली होती. परंतु तेथे मुख्य लढत तृणमूल आणि भाजपामध्येच होती. केरळ आणि आसाममध्येही विद्यमान सरकारला हटविण्यासाठी पक्षनेतृत्वाची दिशाहीनता स्पष्ट झालेली आहे. मीडिया व्यवस्थापनामध्येही पक्षाला अपयश आलेले आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्यात, त्या राज्यातील पक्षाच्या नेत्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला, हेसुद्धा पराभवाचे एक कारण आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन आतातरी काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विचार करतील काय?

    Will the Congress leaders think now Nowadays it is in the interest of the party to take everyone along