आता तर हद्दच झाली राव! चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे?

चीन जर लोकशाहीवर प्रवचन देत असेल तर ते सैतानाच्या तोंडी बायबल देण्यासारखेच आहे. चीनने लोकशाहीची पावलागणिक हत्या केलेली आहे, तरीही भारत आणि अमेरिकेच्या संबंधाबाबत चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इताओ लिजियन यांनी म्हटले आहे की, लोकशाही कोणत्याही देशाचे पेटंट नसून ते मानवतेचे सामान्य मूल्य आहे.

    भारतात निवडणुकांमध्ये पैशांचा जो वापर होतो, त्यावर बोलताना ते म्हणाले की, काही देशात पैशांशिवाय मतेच मिळत नाही. राजकीय पक्ष आपल्या हितासाठी स्वतःला जनतेपेक्षा श्रेष्ठ समजतात. ही लोकशाही नसून श्रीमंतांना अधिक धनवान करणारी व्यवस्था आहे. खरं म्हणजे अशी टीका करण्यापूर्वी चीनने त्यांच्या भूमिका तपासायला हव्यात.

    हाँगकाँगमध्ये चीनने लोकशाही समर्थकांवर कितीतरी अत्याचार केलेले आहेत. काही वर्षांपूर्वी बिजिंगच्या ‘थ्यान आन मेन’ चौकात चीनमध्ये आंतरिक लोकशाहीची मागणी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांवर गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले. चीनमध्ये जर सरकारी इमारत, रस्ते किंवा पूल बांधायचे असल्यास तेथे राहणार्‍या नागरिकांना अज्ञातस्थळी पाठवून त्यांच्या वस्त्यांवर बुलडोझर चालविण्यात येतो. या अन्यायाबाबत न्यायालयात जाण्याचीही तेथे सोय नाही. यावर कोणताही स्टे ऑर्डर मिळत नाही.

    चीनमध्ये राहणाऱ्या उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जातात. इतके सारे जनविरोधी कृत्य करीत असताना चीनला लोकशाहीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? चीनची एकूणच व्यवस्था विचित्र आहे. इ. स. १९४९ पासून चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे, परंतु चीनने आपल्या फायद्यासाठी नियंत्रित भांडवलशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. कारखान्यातील कामगारांकडून जास्तीत जास्त कामे करून घेतात व मोठ्या प्रमाणावर चिनी उत्पादनाची निर्यात केली जाते, परंतु कामगारांना मात्र त्यांच्या श्रमानुसार मोबदला दिला जात नाही.

    पाश्चिमात्य देशांच्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स चीनने खरेदी करून ठेवलेले आहे. गरीब देशांना मोठे कर्ज देऊन त्या देशांना चीन आपल्या दबावाखाली ठेवतो आणि त्या देशावर आपला आर्थिक साम्राज्यवाद लादतो. पाकिस्तान, मालदीव, नेपाळ हे देश चीनच्या आर्थिक साम्राज्यवादाची जिवंत उदाहरणे आहेत. चीन जेव्हा इतर देशासोबत व्यापार करतो, तेव्हा त्यांच्याकडून त्या वस्तूंची रक्‍कम डॉलरमध्येच घेत असतो. यामुळे त्यांच्या खजिन्यात डॉलर इतके झाले आहेत की, या डॉलरच्या भरवशावर चीन आता अमेरिकेलाही धमक्या देऊ लागला आहे. छळ-कपट आणि धोकेबाजी हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग झालेला आहे, तेव्हा असा देश लोकशाहीचे काय धडे देणार?

    With which mouth is China teaching the lessons of democracy