कामाचे तास तर वाढणार पण, कार्यकुशलतेवरही भर देण्याची गरज

 कर्मचार्‍यांना ते ज्या कंपनीत वा संस्थेत काम करतात, त्या संस्थेप्रती त्यांच्यामध्ये आत्मीयता असणे आवश्यक आहे. जी कंपनी रोजी-रोटी देते, त्या कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्नशील असणे आणि प्रामाणिक असणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य समजले पाहिजे.

आगामी १ एप्रिलपासून कामाचे तास वाढविण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. ८ तासाऐवजी १२ तास काम करावे लागणार आहे. प्रत्येक ५ तासानंतर अर्ध्या तासाची विश्रांती दिली जाणार आहे. देशातील कार्य संस्कृतीला चालना देण्यासाठी केंद्राचा हा प्रस्ताव योग्य वाटत असला तरी हा निर्णय लागू करण्यापूर्वी या संदर्भातील आंतरराष्ट्रीय मापदंडाचा विचार करणे योग्य ठरेल. सध्या चीन सोडले तर जगातील कोणत्याही देशात १२ तास काम नाही. अमेरिकेत ९ तास काम करण्यात येते त्यामध्ये १ तास विश्रांतीचा आहे. अनेक अशा कंपन्या किंवा कारखाने आहेत की, तेथील कर्मचारी वा कामगार तन्मयतेने काम करतात तर बरेच कर्मचारी केवळ वेळ कसा जाईल याचाच विचार करीत असतात. बर्‍याच कारखान्यांमध्ये कुशल आणि प्रतिभाशाली कामगार असतात. तर बर्‍याच कर्मचार्‍यांची बुद्धी चालतच नाही.

प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची गती सारखी नसते. प्रत्येक कंपनीमध्ये एच.आर. विभाग असतो. तो विभाग या कर्मचारी वा कामगारावर लक्ष ठेवून असतात. जे कुशल कामगार वा कर्मचारी असतात, त्यांना ती कंपनी पदोन्नती आणि वेतनवृद्धी देत असते. कोणतीही संस्था असो, त्या संस्थेला प्रगती करायची असेल तर त्या संस्थेने कुशल कामगारांना वेगवेगळ्याप्रकारे प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. कॉपोेैरिट कंपन्यांमध्ये कामाचे टार्गेट देण्यात येते. कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावाही घेतला जातो. कर्मचाऱ्यांना ते ज्या कंपनीत वा संस्थेत काम करतात, त्या संस्थेप्रती त्यांच्यामध्ये आत्मीयता असणे आवश्यक आहे. जी कंपनी रोजी-रोटी देते, त्या कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्नशील असणे आणि प्रामाणिक असणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य समजले पाहिजे.

दुसर्‍या महायुद्धामध्ये संपूर्ण राखरांगोळी झालेल्या जपान या देशाने कार्यकुशलतेच्या भरवशावरच मोठी प्रगती केलेली आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांना १२ तास काम करणे शक्‍य होईल काय? शाळा-कॉलेजमध्ये ६ ते ७ तासाच्या वर कर्मचारी कामच करू शकत नाही. बँक कर्मचाऱ्यांनाही हे शक्‍य होणार नाही. भारतातील हवामान उष्ण आहे. एप्रिल-मे महिन्यात १२ तास काम करणे अशक्य आहे. कारखान्यातील कामगारांनी १२ तास काम केले तर त्या कारखान्याचे उत्पादन वाढेल, त्या उत्पादनाची निर्यात करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत काय ?