आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) तर्फे दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती

आकाश डिजिटलच्या ‘सक्सेस इज वेटिंग’ या नव्या ओम्नी-चॅनेल मोहीमेत युवराज सिंग झळकणार आहे. या मोहिमेची सुरुवात या आठवड्यापासून होणार आहे. एका वर्षाचा खंड पडल्यानंतर ज्यांना पुन्हा एकदा प्रवेश परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांवर या माध्यमातून लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी ही मोहीम असणार आहे. अपयश पचवून अधिक ताकदीने, दृढनिश्चयाने आणि संपूर्ण एकाग्रतेने उसळी घेण्याची इच्छा मनात रुजविण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

मुंबई : आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) या परीक्षा पूर्व तयारी सेवेतील राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी संस्थेने युवराज सिंग (Yuvraj Singh) या निष्णात क्रिकेटपटूची त्यांचा ब्रँड अँबेसेडर (Brand Ambassador) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली.

कंपनीला आणि आकाश इन्स्टिट्यूट, आकाश आयआयटी-जेईई, आकाश डिजिटल आणि मेरीटनेशन या त्यांच्या विविध ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रिकेटपटू पुढे सरसावला आहे. आकाशचा एक चेहरा म्हणून युवराज सिंग हा आकाश डिजिटलच्या ‘सक्सेस इज वेटिंग’ या नव्या ओम्नी-चॅनेल मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सक्सेस इज वेटिंग’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट असून डिजिटल माध्यमातून ते बघता येणार आहे.

‘जोशात पुनरागमन’ हा संदेश देणारा आणि स्वत: अतिशय ताकदीने पुनरागमन करणारा हा खेळाडू असल्याने युवराज सिंगची या मोहिमेसाठी केलेली निवड ही अतिशय योग्य आणि प्रेरणादायी आहे. आपल्या देशात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ असल्याने, युवराज सिंगच्या पुनरागमनाच्या गोष्टीभोवती संवाद गुंफले गेले आहेत. सुरुवातीला क्रिकेटमधील यशस्वी कारकीर्द, त्यानंतर कर्करोगाशी त्याने दिलेली झुंज, मग त्यांचे प्रेरणादायी पुनरागमन आणि आता हा मानवतावादी पुढाकार यामुळे हा खेळाडू अनेक भारतीयांसाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे.

युवराज सिंग हा आकाशच्या कुटुंबाचा एक भाग झाल्याचा आम्हाला आनंद आहे. या अवघड परीक्षेत सर्वच विद्यार्थी चांगले कष्टघेतात याची आम्हाला खात्री आहे. तरीही, प्रत्येकाला दरवेळी यश मिळतेच असे नाही याचीही जाणीव आम्हाला आहे. विद्यार्थ्यांच्या अशा संघर्षाच्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी उभे तर आहोतच शिवाय आम्हाला त्यांच्या उणीवांची जाणीव देखील आहे आणि त्यांच्या प्रबळ महत्त्वाकांक्षेसाठी आम्ही त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे असे आम्हाला वाटते. तरुणांमधील युवराजची लोकप्रियता आणि त्याची निर्विवाद यशोगाथा आणि प्रेरणादायी पुनरागमन या बळावर, अपयश पचवून अधिक ताकदीने, दृढनिश्चयाने आणि संपूर्ण एकाग्रतेने उसळी घेण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न युवराज करू शकेल याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे.

आकाश चौधरी, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)

या चित्रपटात युवराज सिंगच्या आयुष्यातील चढ-उतार उलगडले गेले आहेत. काही दृश्यांमध्ये तो उखडलेले क्रिकेट स्टम्प्स, त्याला मिळालेल्या ट्रॉफी आणि पदके, त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी आसुसलेल्या चाहत्यांचे फोटो आणि आता तो संघाचा एक भाग नसल्याची बातमी देणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या बघत असल्याचे दिसते. या दृश्यांमध्येच अभ्यास करणाऱ्या, आरशातील आपल्या प्रतिबिंबाकडे अतिशय दृढनिश्चयाने पाहणाऱ्या तर कधी अनिश्चिततेचा भाव डोळ्यात दाटलेल्या शाळकरी मुलांच्या दृश्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नव्या जोमाने यशाच्या मार्गावर पुन्हा एकदा वाटचाल करण्याची प्रेरणा या चित्रपटातून देण्यात आली आहे.

या प्रसंगी बोलताना प्रख्यात क्रिकेटपटू युवराज सिंग म्हणाला, “विद्यार्थ्यांनी कधीही हार मानू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि अशा अतिशय अवघड परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या आकाश इन्स्टिट्यूटविषयी मला आत्मीयता वाटते. चित्रपटाचे कथानक म्हणजे जणू काही माझ्या आयुष्याचे प्रतिबिंबच! मी अनेक चढ-उतार बघितले. जेव्हा जग तुमच्यावर अयशस्वी असल्याचा शिक्का मारते तेव्हा तुम्ही स्वत:ला यशस्वी समजा हे मी या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. तुमच्यावर तुमच्या स्वत:पेक्षा जास्त विश्वास असलेल्या मार्गदर्शकाचा शोध घ्या. आणि असे झाले की मग पुन्हा मागे वळून बघायची गरजच पडणार नाही याची हमी मी तुम्हाला देतो.”

सद्य परिस्थिती आणि पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना तयारीसाठी असणारा कमी कालवधी बघता, डिजिटल स्वरूप हे विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम माध्यम आहे. परीक्षेच्या तयारीसाठी उत्कृष्ट डिजिटल क्षमतेच्या माध्यमातून आकाश इन्स्टिट्यूटच्या ठोस शिक्षणपद्धतीद्वारे आकाश डिजिटल आपले वेगळेपण सिद्ध करत आहे.

शैक्षणिक यश प्राप्त करण्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नात त्यांना मदत करण्याचे आकाश इंस्टिट्युटचे उद्दिष्ट आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षिणक समुहाने (नॅशनल अकॅडमिक टीम)ने तयार केलेला अभ्यासक्रम आणि आशय विकास (कन्टेंट डेव्हलपमेंट) तसेच शिक्षक प्रशिक्षण आणि देखरेख अशी केंद्रीय अंतर्गत प्रणाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, विविध वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत आणि एनटीएसई, केव्हीपीवायसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत तसेच ऑलंपियाड्समध्ये एईएसएलच्या विद्यार्थ्यांची निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे.