आरटीईतील प्रतीक्षा यादीतील प्रवेश २ ऑक्टोबरपासून

मुंबई : आरटीई प्रवेशाच्या पहिल्या सोडतीतील प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आरटीईच्या पहिल्या सोडतीमध्ये राज्यभरातून ६८ हजार २०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे १ लाख १५ हजार ४७२ जागांपैकी ४७ हजार २६९ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेश ८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

राज्यभरातून पहिल्या फेरीसाठी १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. २९ सप्टेंबरला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. यामध्ये मुंबईतून निवड झालेल्या ५३७१ विद्यार्थ्यांपैकी ३१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आता २ ऑक्टोबरपासून प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाची तारीख कळवण्यात येणार आहे. परंतु ज्या पालकांना मेसेज येणार नाही. त्यांनी आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख अर्ज क्रमांक टाकून निश्चित करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून पालकांना दिल्या आहेत.

शाळेत प्रवेशासाठी पालकांनी गर्दी करू नये, तसेच बालकांना प्रवेशासाठी आणू नये. तसेच प्रवेशासाठी पालकांनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीबरोबरच पोर्टलवरून हमी पत्र आणि अ‍ॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून सोबत आणावी अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.