संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षेला विलंब झाला. मात्र कोरोनामुळे आलेल्या विविध संकटाचा सामना करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी दुपारी 1 वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) फेब्रुवारी-मार्च 2020चा निकाल जाहीर केला. 

मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये राज्याचा निकाल 90.66 टक्के लागला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात 4.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 88.04 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल हा 5.84 टक्क्यांनी अधिक आहे.

त्याचप्रमाणे यंदा पुन्हा कोकणाने बाजी मारली. कोकणचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर त्याखालोखाल पुणे 92.50, कोल्हापूर 92.42 टक्के निकाल लागला आहे. तर मुंबईचा निकाल 89.35 टक्के लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून 17 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान घेतलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळातून यंदा बारावीच्या परीक्षेला 14 लाख 20 हजार 575 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील 14 लाख 13 हजार 387 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 7 लाख 78 हजार 168 मुले तर 6 लाख 35 हजार 519 मुलींचा समावेश होता. राज्यातून 12 लाख 81 हजार 712 इतके विद्यार्थी उतीर्ण झाले असून, यामध्ये मुलांची संख्या 6 लाख 85 हजार 66 तर मुलींची संख्या 5 लाख 96 हजार 646 इतकी आहे. मुलांचा निकाल हा 88.04 टक्के इतका लागला आहे तर मुलींचा निकाल 93.88 टक्के इतका लागला आहे. यातून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. राज्यातील नऊ मंडळातून 86 हजार 739 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 86 हजार 341 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 33 हजार 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी 39.03 आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के इतका लागला आहे. राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या 154 विषयांच्या परीक्षांमध्ये 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच खासगीरित्या 33 हजार 867 विद्यार्थी परीक्षेला बसले असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी 72.08 टक्के आहे.

त्याचप्रमाणे कोकणाने आपला अव्वल क्रमांक यंदाही कायम ठेवला आहे. कोकण विभागाने 95.89 टक्क्यांनी निकालात बाजी मारली आहे. कोकणातून 30 हजार 143 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 28 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 14 हजार 578 मुले असून, मुलांचा निकाल 94.11 टक्के तर 14 हजार 325 मुली असून, मुलींचा निकाल 97.68 टक्के लागला आहे. कोकण विभागाखालाोखाल पुणे 92.50, नागपूर 91.65, कोल्हापूर 92.42, अमरावती 92.09 टक्के निकाल लागला आहे. तर मुंबईचा निकाल 89  .35 टक्के लागला आहे. तर गतवर्षी निकालाच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादचा निकाल सर्वाधिक कमी लागला आहे. औरंगाबादचा निकाल 88.18 टक्के इतका लागला आहे.

विभागनिहाय  निकाल

पुणे : 92.50

नागपूर : 91.65

औरंगाबाद : 88.18

मुंबई : 89.35

कोल्हापूर : 92.42

अमरावती : 92.09

नाशिक : 88.87

लातूर : 89.79

कोकण : 95.89

एकूण : 90.66

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन लिंक

ऑनलाईन निकालानंतर दुसर्‍या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेपासून प्रथमच ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी, शर्थी व सूचना दिल्या आहेत. या प्रक्रियेसाठीची शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैदरम्यान तर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधाण्यासाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत लगतच्या दोन परीक्षांना बसण्याची मुभा आहे.