उच्च शिक्षणातही २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करावी; विविध संघटनांची मागणी

कोरोना महामारीच्या संकटात शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय नुकताच झाला. याचाच आधार घेत उच्च शिक्षण अभ्यासक्रमातही कपात करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटात शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय नुकताच झाला. याचाच आधार घेत उच्च शिक्षण अभ्यासक्रमातही कपात करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रहार विद्यार्थी संघटना आणि नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि ऑल इंडिया सेटनेट टीचर्स संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. या संघटनांनी उच्च व तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले आहे.

कोरोना संकटामुळे २५ टक्के अभ्यासक्रम कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल, प्रथम वर्षाचे प्रवेशही या संकटामुळे उशीराने होत आहेत. यातच अद्याप महाविद्यालयेही सुरू झाली नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही, म्हणून शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात यावा अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (१९ ऑगस्ट २०२०) उदय सामंत यांना भेटून  केली असल्याचे मनोज टेकाडे  प्रहार विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Covid-19 च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांना या संकटास सामोरे जावे लागत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात रेंगाळत असताना दुसरीकडे प्रथम वर्षाचे सत्र वगळता इतर सत्रांचे अभ्यासक्रम ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत परंतु काही विद्यार्थ्यांना online च्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीच्या समस्या तर काहींना आर्थिक समस्या असल्याने उपलब्ध संसाधनांची कमतरता भासते आहे. या सर्व बाबींचा विचार करून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र वगळता इतर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत अशा सर्व उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमाच्या २५ टक्के अभ्यासक्रमातील भाग कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल व शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर तसा शासननिर्णय निर्गमित करून विद्यापीठाना तशा सूचना करण्याची विनंती आम्ही सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने मंत्री महोदयांना केली असल्याचेही मनोज टेकाडे म्हणाले.

‌या शिष्टमंडळात प्रहार विद्यार्थी संघटनेचे मनोज टेकाडे (अध्यक्ष) अजय तापकीर (सरचिटणीस) नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन संघटनेचे प्रा.कुशल मुडे ,प्रा. भुपेश मुडे सर यांचा समावेश होता.