आयटीआय २२ जुलैपासून होणार सुरू; पण, नियमांचे काटेकोर पालन करावेच लागणार

शासकीय व खासगी आयटीआयमध्ये दरवर्षी साधारणपणे एक लाखांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र गतवर्षी आलेल्या कोरोनामुळे आयटीआयचे प्रशिक्षणही ऑनलाईन देण्यात येत होते. मात्र आयटीआयचे प्रशिक्षणांमध्ये ७० टक्के भाग हा प्रात्याक्षिक प्रशिक्षणाचा तर ३० टक्के भाग हा सैद्धांतिक प्रशिक्षणाचा (थिअरी) असतो. त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचे कौशल्यात वाढ करण्यात अडचणी येत होत्या.

  मुंबई: कोरोनामुक्त ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्यानंतर आता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआयमधील प्रशिक्षण २२ जुलैपासून सुरू करण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रात्याक्षिक प्रशिक्षणावर भर देण्यात येतो. त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आयटीआयमधील प्रशिक्षण २२ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.

  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय हे आयटीआयच्या माध्यमातून राज्यात कौशल्य मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये आदिवासी भागात ६१, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलामुलींसाठी ४, अल्पसंख्यांकासाठी २, महिलांसाठी १५, आदिवासी आश्रमशाळा आयटीआय २८ संस्थांचा समावेश आहे. त्याचबरोबर ५५० खासगी आयटीआय राज्यभरात कार्यरत आहेत.

  शासकीय व खासगी आयटीआयमध्ये दरवर्षी साधारणपणे एक लाखांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र गतवर्षी आलेल्या कोरोनामुळे आयटीआयचे प्रशिक्षणही ऑनलाईन देण्यात येत होते. मात्र आयटीआयचे प्रशिक्षणांमध्ये ७० टक्के भाग हा प्रात्याक्षिक प्रशिक्षणाचा तर ३० टक्के भाग हा सैद्धांतिक प्रशिक्षणाचा (थिअरी) असतो. त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचे कौशल्यात वाढ करण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयटीआयमधील प्रशिक्षण प्रत्यक्षात सुरू करण्यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआयमधील प्रशिक्षण प्रत्यक्षात सुरू करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. याची दखल घेत राज्य सरकारने २२ जुलैपासून आयटीआयमधील प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

  ही परवानगी देताना सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सैद्धांतिक प्रशिक्षण हे ऑनलाईन माध्यमाद्वारेच घ्यावे व प्रात्याक्षिकच फक्त प्रशिक्षण संस्थांमध्ये घ्यावे. प्रात्याक्षिक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींचे गट तयार करावेत. पात्र प्रशिक्षणार्थींचे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी व निर्देशकांचे प्रथम प्राधान्यांने लसीकरण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

  केंद्र सरकार, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून प्रात्यक्षिक सत्र घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

  ITI to start from July 22 But the rules must be strictly adhered to