प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही : प्रा.वर्षा गायकवाड

स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच पुढील निर्णय

मुंबई : पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. आरोग्य खात्याकडून आणि प्रशासनाकडून कोरोनाबाबतच्या अहवालाचा आणि सुचनांचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा आणि आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हीत लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी अनौपचारिक चर्चेत दिली.

नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू आहेत
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी आणि शिक्षक संक्रमित झालेले नाहीत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, असे त्या यावेळी म्हणाल्या.

सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग भरणार
शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक आणि सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर आणि आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही, असे त्या म्हणाल्या.

पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत नुकसान होवू नये म्हणून विचार
राज्यातील सुरू झालेल्या शाळा मधील विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढत आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शैक्षणिक वर्षांचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास आणि परीक्षा पध्दतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञांशी विचार विनिमय चालू आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा होतील
दहावीआणि बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशिरा म्हणजे  एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतील. हळूहळू सर्व सुरळीत होत आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन, तसेच सरकारचे प्रयत्न यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू, असा आत्मविश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.