नीट, जेईई परीक्षा घेण्यास उशीर केल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाणार?

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांना भयानक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याची झळ शिक्षण क्षेत्रालाही लागली आहे. नीट व जेईई परीक्षांवरून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोरोना महामारीमुळे (corona virus ) सर्वच क्षेत्रांना भयानक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याची झळ शिक्षण (education) क्षेत्रालाही लागली आहे. ‘नीट’ (neet) व ‘जेईई’ (jee) परीक्षांवरून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वैद्यकीय(medical) आणि अभियांत्रिकी (engineering) प्रवेशासाठीच्या ‘नीट’ व ‘जेईई’ या परीक्षा घेण्यास आणखी उशीर करण्याची परिणती हे शैक्षणिक वर्ष निर्थक ठरण्यात (झिरो अकॅडमिक इयर) होईल, तसेच या महत्त्वाच्या परीक्षांना एखादा जलद पर्याय शोधण्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावून त्याचे व्यापक परिणाम होतील, असे मत अनेक भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या (आयआयटी) संचालकांनी व्यक्त केले आहे.

कोविड-१९(covid-19) ची प्रकरणे वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी जोर धरत असतानाच, या परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन आयआयटीच्या संचालकांनी केले आहे.

‘कोरोना महासाथीने आधीच अनेक विद्यार्थी व संस्थांच्या शैक्षणिक योजना विस्कळीत झाल्या आहेत आणि हा विषाणू लवकर जाईल असे दिसत नाही. आम्ही हे शैक्षणिक वर्ष निष्फळ ठरू द्यायला नको, कारण त्याचा अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर परिणाम होऊ शकेल’, असे आयआयटी रुरकीचे संचालक अजित चतुर्वेदी म्हणाले. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.

‘या परीक्षांची त्यांच्या गुणवत्तेसाठी जागतिक कीर्ती असून, त्या जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानल्या जातात. त्यांना एखादा जलद पर्याय शोधणे हे नक्कीच या परीक्षा देण्याइतके समाधानकारक असणार नाही’, असे आयआयटी खडगपूरचे संचालक वीरेंद्र तिवारी म्हणाले.

या परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय एका रात्रीत नव्हे, तर पुरेसा विचारविनिमय करून घेण्यात आला असल्याचे आयआयटी रोपरचे संचालक सरित कुमार दास यांनी सांगितले. या परीक्षा घेण्याच्या शक्यतांबाबत आम्ही बऱ्याच काळापासून चर्चा करत आहोत. त्यासाठीच्या पायाभूत सोयी, विद्यार्थ्यांची सुरक्षा, अंतराचे पालन व इतर निकष पाळून या परीक्षा जास्तीत जास्त सुरक्षित करण्याबाबत आम्ही विचार केला आहे, असे ते म्हणाले.