परिस्थितीवर मात करत कर्णबधिर विद्यार्थ्यांनी मिळवले यश

मुंबई : घरची आर्थिक बिकट परिस्थिती… वडिलांच्या निधनामुळे लोकांची धुणी भांडी करून कसबस घर चालवणारी आई… त्यातच असलेले व्यंग… यावर मात करत तेजस सोनावणे व किशोर डोळस या दोन कर्णबधिर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. तेजसने ८४ तर किशोरने ८६ टक्के गुण मिळवले आहेत. 

तेजस व किशोर हे दोघेही चेंबूरमधील रोचिराम टी थडाणी हायस्कूल फॉर हिअरिंग हॅण्डीकॅप शाळेमध्ये शिकत आहेत. तेजसचे वडील लहान असताना कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी तेजसच्या आईच्या खांद्यावर आली. तेजस हा जन्मापासून फक्त कर्णबधिरच नसून त्याला एक कानही नाही. तेजस व त्याचा मोठा भाऊ हे दोघेही शिकत असल्याने व घराचा रहाटगाडा हाकण्यासाठी तेजसच्या आईने घरकाम करून दोन्ही मुलांना वाढवले व त्यांना शिक्षण देण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. त्यातच आईला क्षयरोगाने ग्रासल्याने तिला अनेकदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागते. घरची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तेजसच्या भावाने काम करून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. घरच्या या हालाखीच्या परिस्थितीमध्येही तेजसने आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ न देता शाळेतील शिक्षकांच्या मदतीने अभ्यास केला. तेजसच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. त्याने दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवले. शिक्षणाबरोबर तेजसला नृत्याची आवड आहे. त्याला शाळेच्या सहकार्याने डान्स मास्टर रेमो यांच्याकडे प्रशिक्षणाला जातो. त्यातील कौशल्य पाहून रेमो कोणताही मोबदला न घेता त्याला डान्स शिकवतात. 

किशोर डोळस हा कर्णबधिर असण्याबरोबरच त्याच्या डोळ्यांमध्येही समस्या आहे. एका डोळ्याने त्याला व्यवस्थित दिसत नसल्याने त्याला जाड चष्मा वापरायला लागतो. किशोरच्या वडिलांचे लहान असताना अचानक निधन झाल्याने सगळी जबाबदारी अशिक्षित असलेल्या आईवर येऊन पडली. परंतु आईने न डगमगता घरकाम करून घराचा रहाटगाडा जबाबदारीने सांभाळला. घरची परिस्थिती आणि आईची धडपड पाहून किशोरने अभ्यासाची जिद्द कायम ठेवली आहे. तो दररोज पहाटे पाच वाजता उठून अभ्यास करत असे. आतापर्यंत त्याने शाळेतील सर्व परीक्षेत आपला पहिला क्रमांक सोडला नाही. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतही त्याने अनेक पदके पटकावली. गेल्यावर्षी रोटरी क्लबतर्फे त्याला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाले. 

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने दहावीचा टप्पा गाठून ८६ टक्के गुण मिळवले. किशोरने सर्वांसमोर मेहनत करणे आपल्या हातात असते आणि हाच आपल्या उद्दिष्टांकडे नेणारा मार्ग असल्याचे दाखवून दिले आहे.