मुंबई विद्यापीठाच्या ‘हिंदू स्टडीज’ पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रारंभ

मुंबई विद्यापीठात (Mumbai University) नव्याने सुरू करण्यात आलेल्या सेंटर फॉर हिंदू स्टडीज (Center For Hindu Studies) (हिंदू अभ्यास केंद्र) या केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यास केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) नव्याने सुरू करण्यात आलेल्या सेंटर फॉर हिंदू स्टडीज (Center For Hindu Studies) (हिंदू अभ्यास केंद्र) या केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यास केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या मास्टर ऑफ आर्ट इन हिंदू स्टडीज या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० एवढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर (Degree) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हिंदू (Hindu) धर्माच्या प्रमुख तत्त्वांवर प्रकाश टाकण्यात आला असून यामध्ये प्राणीमात्रांवर विचार करणारे तत्त्वज्ञान, ज्ञानशास्त्र आणि युक्तीवाद अशा विविध पैलूंवर या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.

    हिंदू धर्म हे कोणत्याही कर्मकांडाच्या पद्धतीत संकुचित करता येत नसून ते सार्वत्रिक शांतता, विश्वबंधुत्वता, विविध विचार, श्रद्धा, कल्पना आणि प्रथा यांच्या शांततापूर्णसह अस्तित्वावर विश्वास ठेवत असून सर्व सजीव आणि निर्जीव घटकांना एक परम अस्तित्व व एक कुटुंब म्हणून जगाचे रुप मानणे ही या केंद्रांची प्रमुख वैशिष्ट्य असून अशा वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा अभ्यास करता येणार आहे. तसेच कॉर्पोरेट्सना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वचनबध्दता, समर्पण आणि प्रेरणा विकसित करण्यासाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे या केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे यांनी सांगितले.

    पीएचडीचे अभ्यासक्रमही राबवणार
    केंद्रामार्फत लवकरच प्रमाणपत्र (Certificate), पदविका (Diploma) आणि पीएचडीचे (Ph.D) अभ्यासक्रमही राबविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातील अनेक विद्यापीठात हा अभ्यासक्रम शिकवला जात असून या विषयाचा नेट- सेट परीक्षेतही समावेश करण्यात आला आहे. हे अभ्यास केंद्र विद्यानगरी संकुलातील बजाज भवन येथे कार्यरत आहे. या केंद्राच्या अधिक माहितीसाठी या केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे (Dr. Ravikant Sangurde) आणि प्रभारी उपसंचालक डॉ. माधवी नरसाळे यांच्याशी संपर्क साधता येईल.