विचारांचे सीमोल्लंघन होऊन नवदुर्गांचा नाविन्यपूर्ण वैचारिक प्रवास पूर्णत्वास गेला – प्राचार्य डॉ.लीना राजे

वाचन प्रेरणा दिन असा दिवस साजरा करण्यापेक्षा रोजच वाचन करणे गरजेचे आहे. आपली साहित्यिक संस्कृती प्रचंड प्रगल्भ आहे. जेवढे वाचन कराल तेवढे वैचारिकदृष्टया प्रगती कराल. मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा: नवविचार’ ही व्याख्यानमाला ज्या उद्देशांने सुरू केली ती सार्थकी लागली आहे. घटस्थापनेला आपण अनघा मोडक यांचा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास ऐकला.

    ‘नवदुर्गा: नवविचार’ ह्या व्याख्यानमालेची सुरूवात घटस्थापनेपासून होऊन ‘वाचन प्रेरणा दिनी’ संपन्न झाली. नवशक्तीच्या नवदुर्गेला आज आपण निरोप देऊन भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना अभिवादन करून व्याख्यानमालेची सांगता करीत आहोत. ह्या नवदुर्गा प्रत्येक क्षेत्रात आपले अलौकिक कार्य करणऱ्या आहेत.विचारांचे सीमोल्लंघन होऊन नवदुर्गांचा नाविन्यपूर्ण वैचारिक प्रवास ह्या व्याख्यानमालेत पूर्णत्वास गेला असेच, मला म्हणावेसे वाटते.’’असे उदगार मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा : नवविचार’ह्या व्याख्यानमालेची सांगता ‘वाचन प्रेरणा दिनी’ संपन्न झाली त्या प्रसंगी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी शाह कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.लीना राजे यांनी काढले.

    वाचन प्रेरणा दिन असा दिवस साजरा करण्यापेक्षा रोजच वाचन करणे गरजेचे आहे. आपली साहित्यिक संस्कृती प्रचंड प्रगल्भ आहे. जेवढे वाचन कराल तेवढे वैचारिकदृष्टया प्रगती कराल. मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा: नवविचार’ ही व्याख्यानमाला ज्या उद्देशांने सुरू केली ती सार्थकी लागली आहे. घटस्थापनेला आपण अनघा मोडक यांचा तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास ऐकला.

    अनघा मोडक ह्यांनी ‘प्रत्येक गोष्टीकडे कसे सकारात्मक दृष्टीने पाहता पाहता जगण्याचे गाणे कसे करावे’ हा संदेश दिला. तर ‘निसर्गाने इतक्या गोष्टी भरभरून आपणांस दिल्या आहेत की आपल्या आत विस्मृतीत गेलेली गोष्ट पुन्हा जागृत करा आणि टेलीपैथीने प्राण्यांशी सुसंवाद साधा’ असा एक अलौकिक विचार प्राणी अभ्यासक रश्मी उंडे ह्यांनी दिला. ‘आपणच आपली मातृभाषा विसरू पाहतो आहे का ? असा प्रश्न राजस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कृत असलेल्या प्रितम पंडित-फिसरेकर यांनी उपस्थित केला. तसेच ‘मातृभाषा प्रत्येकाने आत्मीयतेने जपली पाहिजे’ असे सांगत प्रत्येक विद्यार्थींनीच्या डोळ्यात अंजन घातले.

    ‘उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे ।’ असे म्हणणारे आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढीत. कृतींची दुर्गा घडणे ही आज काळाची गरज आहे’,असे म्हणतं ‘स्वसंरक्षण’ हा विषय समजून सांगताना मार्शल आर्टिस्ट पूजा पांडे यांनी प्रत्यक्ष मार्शल आर्टस् मधील काही प्रात्यक्षिक विद्यार्थींनीना करून दाखविले.

    ‘ॐ असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्मामृतं गमय || अर्थात मानवाचा प्रवास असत्याकडून सत्याकडे ने,अंधाराकडून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने, असा घडला पाहिजे. आज सगळ्यांनीच समाजाचे ऋण हे आपण आनंदाने फेडलेच पाहिजे.’ही सामाजिक जाणीव समाजसेविका हिरामणी वाधवा यांनी करून दिली. ‘विद्यार्थींनी स्वतःचे ध्येय ठरविले पाहिजे.

    आज आपण कोणाचे तरी आदर्श समोर ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे. आकर्षणाच्या मोहात न अडकता ध्येयाकडे वाटचाल करून भविष्यात अनेकांसाठी आपण प्रेरणास्थान झाले पाहिजे’ हे प्रेरणादायी विचार ‘युवतींचे मानसशास्त्र’ समजून सांगताना डॉ.तक्षशिला मोटघरे यांनी मांडले. ‘मासिक पाळीला कधीच प्रोब्लम समजू नका मासिक पाळी ही तुम्हाला मिळालेले वरदान आहे. स्वतः कडे पाहा जसे मैं तो मैं हू , ना तूज जैसी, ना उस जैसी, मैं तो मैं हू, खुद का जुन्नून | मासिक पाळी ह्या सौंदर्याचा आपण गौरव केला पाहिजे’,असा आरोग्यदायी संदेश डॉ. अंजली नरदे ह्यांनी विद्यार्थींनीना दिला.

    ‘कोणाच्याही हदयात स्थान मिळवायचे असेल तर आधी त्याच्या पोटापर्यंत पोहचले पाहिजे, मग मनात स्थान आपोआप निर्माण होईल.’मेधा यांचा वीस वर्षांचा अन्नपूर्णेचा प्रवास मेधा किचनपर्यंत कसा पोहला. त्यातील कडूगोड अनुभवातून आज वीस महिलांना रोजगार देणाऱ्या मेधा देशपांडे ह्यांनी मांडला. ह्या व्याख्यानमालेची सांगता ‘वाचन प्रेरणा दिनी’ होऊन ह्याकरीता विशेष उपस्थित जान्हवी दरेकर व स्नेहल जंगम ह्यांनी उत्कृष्ट कविता वाचन व प्रेरणादायी लेखांचे अभिवाचन करून केली. असा प्रत्येक व्याख्यानाचा आढावा प्राचार्य डॉ. लीना राजे यांनी घेतला.

    सदर कार्यक्रमात महाविद्यालय आणि मराठी विभागातर्फे प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. रेणुका प्रजापती, डॉ. रेखा शेलार, प्रा. किरण जाधव, डॉ.स्वाती मोहिते यांनी केले. तर सूत्रसंचालन गोड व लाघवी आवाजात माधवी पवार ह्या विद्यार्थींनीने केले.

    प्रियंका जोगदंड ह्या विद्यार्थींनीने उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थींनी व पालक मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सुरेखा पवार ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम गुगल-मीटवर ई-पध्दतीने पार पाडण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील प्रा.वसंत पानसरे आणि डॉ.रश्मी शेटये-तुपे यांनी अथक परिश्रम घेतले.