आजपासून राज्यभरातील शाळा सुरू होणार

    कोरोना (Corona) महामारी आणि त्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) यामुळे राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी ऑनलाईन (Online) वर्ग भरवण्यात येत होते. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावे लागत होते. सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आल्यानंतर शाळा (School) कधी सुरु होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानुसार आज १३ जूनपासून शाळा सुरु होत आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. मात्र, विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत.

    राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा आज १३ जून रोजी सुरु होत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावले जावे असे आदेशात म्हटले आहे. १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि कोरोना संदर्भात उद्बोधन करायचे आहे. शाळेत येणारे विद्यार्थी आणि पालकांचे कोरोना प्रादुर्भावाबाबत प्रबोधन करावेदेखील आदेशात म्हटले आहे.

    राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी, राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरु होणार असून या दिवशी फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिले पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. तसेच, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स (Child Task Force) असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.