बारावीचा निकाल १८.४१ टक्के तर दहावीचा निकाल ३२.६० टक्के !

- दहावीच्या निकालात वाढ, बारावीच्या निकालात घसरला

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३ डिसेंबरला जाहीर झाला अाहे. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ९.७४ टक्क्यांनी वाढला. तर बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४.७६ टक्क्यांनी घटला www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर दहावी व बारावीच्या निकालाची ऑनलाईन प्रत उपलब्ध करण्यात अाली अाहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेचा निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर झाला. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आली. दहावीची फेरपरीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला तब्बल ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. यातील १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३२.६० टक्के इतकी आहे. दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालात यंदा वाढ झाली असून, औरंगाबाद विभागाने बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ३९.११ टक्के लागला. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा २९.५२ टक्के इतका लागला. नाशिक ३७.४२ टक्के, कोकण ३४.०५ टक्के, लातूर ३३.५९ टक्के, अमरावती ३२.५३ टक्के, पुणे ३०.७६ टक्के, कोल्हापूर ३०.१७, मुंबई २९.८८ टक्के इतका निकाल लागला.

बारावीच्या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचससी व्होकेशनल या शाखांतील ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९ हजार २७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार ७५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी १८.४१ टक्के इतकी आहे. दहावीप्रमाणे बारावीच्या निकालामध्येही औरंगाबाद विभागाने बाजी मारली अाहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक २७.६३ टक्के इतका लागला तर कोकणचा निकाल सर्वाधिक कमी १४.४२ टक्के लागला आहे. नाशिक २३.६३ टक्के, लातूर २२.०५, नागपूर १८.६३ टक्के, मुंबई १६.४२ टक्के, अमरावती १६.२६ टक्के पुणष १४.९४ टक्के आणि कोल्हापूर १४.८० टक्के निकाल लागला आहे.

२४ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात
ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, मुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दहावीसाठी https://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत ५० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करता येणार आहे. तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २४ डिसेंबरपासून १२ जानेवारीपर्यंत ४०० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करता येणार आहे.

समुपदेशकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व विभागीय मंडळात समुपदेशक नेमण्यात आले आहेत. ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून पुढे सात दिवस कार्यरत राहील.

अकरावीच्या प्रवेशासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र
एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्षे २०२०-२१ मध्ये एटीकेटी सवलीतद्वारे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.

तीन वर्षातील उत्तीर्णतेची तुलनात्मक माहिती
इयत्ता जुलै-ऑगस्ट २०१८ जुलै २०१९ नोव्हेंबर डिसेंबर २०२०
दहावी २३.६६ २२.८६ ३२.६०
बारावी २२.६५ २३.१७ १८.४१