आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता ‘राजा हरिश्चंद्र’, चित्रपटाला १०८ वर्ष पूर्ण!

भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.

    भारतीय चित्रपटसृष्टीला आज १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत. दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हापासून भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली असे मानले जाते. आज ३ मे रोजी १०८ वर्षे पूर्ण होत आहेत. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला मुकपट होता.

    दादासाहेब फाळके निर्मित “राजा हरिश्चंद्र” हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला. मा.दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र‘ या चित्रपटाद्वारे प्रथमच “हलत्या चित्रां‘चे दर्शन घडवीत भारतीयांच्या “चित्रपट वेडाची‘ मुहूर्तमेढ रोवली. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घेतली असतानाच मराठी, तमीळ व बंगालीसारख्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनीही आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

    “हलत्या चित्रांचा विजय असो,‘ म्हणत मा.फाळक्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परदेशामध्ये फिल्मच्या मदतीने पडद्यावर हलते चित्रपट दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला व हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी दादासाहेब फाळके या अवलियानं कंबर कसली व “राजा हरिश्चंद्र” च्या रूपानं भारतात मोठ्या पडद्यावर हलती चित्रे दिसली. “भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.

     १९१८ मध्ये इंडियन सिनेमॅटोग्राफ कायदा पास झाला व मुंबई, कलकत्ता, मद्रास व लाहोर बोर्ड १९२० मध्ये सुरू झाले. कलकत्त्यामध्ये धीरेन गांगुली व मुंबईमध्ये चंदुलाल शहा यांनी ब्रिटिश आणि जर्मनांची मदत घेत चित्रपट आधुनिक करण्यास सुरवात केली. हिमांशू रॉय यांनी “द लाइट ऑफ एशिया‘ची निर्मिती करीत भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. याच दरम्यान इम्पिरिअल फिल्म कंपनीने १४ मार्च १९३१ ला “आलम आरा‘ या भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. या चित्रपटात प्रथम गाण्यांचा समावेश केला गेला व चित्रपटाच्या यशामुळे भारतीयांच्या गाणी व संवादांच्या आवडीचं बीज रोवलं गेलं! चलचित्रांबरोबरच आवाजही आल्यानं “टॉकीज‘चा जन्म झाला.